होमपेज › Sangli › भाजप सरकारविरोधात शिवसेनेचे गाजर आंदोलन

भाजप सरकारविरोधात शिवसेनेचे गाजर आंदोलन

Published On: Dec 13 2018 1:40AM | Last Updated: Dec 12 2018 8:58PM
सांगली : प्रतिनिधी

भाजपकडून सांगलीकरांना निव्वळ आश्‍वासनाचे गाजरच दाखवित दिशाभूल सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. याचा निषेध करीत स्टेशन चौकात शिवसेनेने भाजप सरकारविरोधात गाजर आंदोलन केले. आयर्विन पुलाला समांतर पूल, सांगली तालुक्यासह विविध घोषणांचे काय झाले, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनाचे आयोजन जितेंद्र शहा आदींसह कार्यकर्त्यांनी केले होते.यावेळी बजरंग पाटील, अजिंक्य पाटील, अनिल शेटे, रावसाहेब खोचगे, रावसाहेब घेवारे, सुनीता मोरे, धर्मेंद्र पवार, हरी पाटणकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहा म्हणाले, भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेला 12 कलमी कार्यक्रमांची घोषणा केली होती. त्यावर विश्‍वास ठेवून जनतेने भाजपला संधी दिली. पण चार वर्षे लोटली तरी लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी सांगलीकरांना निव्वळ आश्‍वासनांचे गाजरच दाखविले आहे.  आता पुन्हा महापालिका निवडणुकीचे बक्षीस म्हणून 100 कोटी रुपयांचा पाऊस सुरू आहे. ते म्हणाले, सांगली तालुका करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु अद्याप त्यावर काहीच निर्णय झालेला नाही. आयर्विन पुलाला 2 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे 2015 मध्ये सांगितले. पण अद्याप पुलासाठी 20 रुपयेही खर्च झाले नाहीत. हरिपूर-कोथळी पुलाचेही तसेच आहे. 

पेठनाका ते मिरज सहापदरी व राष्ट्रीय महामार्ग करण्याची घोषणा केली. त्यासाठी 1300 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केल्याचे सांगण्यात आले. पण अद्याप चौपदरी रस्त्याचाच खेळ सुरु आहे. तुंग ते सांगलीवाडी टोलनाका रस्त्याचा प्रश्‍न मिटलेला नाही. त्याचे कामही निकृष्टच सुरू आहे. सांगलीला सुसज्ज  कारागृह करू, अशी घोषणा केली. पण त्याचा काहीच निर्णय झालेला नाही. खासदारांनी तर रांजणीत ड्रायपोर्ट, रेल्वे कोच डबे निर्मितीचा कारखाना आणण्याची घोषणा केली. पण अद्याप त्याचे काहीच झाले नाही. ते म्हणाले, सांगलीला नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा हवेतच विरली आहे. सांगलीत अत्याधुनिक बसपोर्ट करण्याच्याही निव्वळ वल्गनाच ठरल्या आहेत. मुंबई - बंगळूर इकॉनॉमिक कॉरिडोरमध्ये सांगलीचा समावेश करण्याची पोकळ घोषणा ठरली आहे. पालकमंत्री दाखवा, हजार रुपये मिळवा, असे म्हणण्याची जनतेवर वेळ आली आहे.