Mon, Jul 13, 2020 06:34होमपेज › Sangli › वाकुर्डेमुळे शिराळा-वाळव्यात हरितक्रांती शक्य

वाकुर्डेमुळे शिराळा-वाळव्यात हरितक्रांती शक्य

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 12:18AMशिराळा : विठ्ठल नलवडे

युती शासनाच्या काळामध्ये दि. 28 जानेवारी 1999 रोजी तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे, आमदार शिवाजीराव नाईक, लोकनेते (कै.) फत्तेसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीत बादेवाडी येथील कामास सुरूवात झाली. सन 2000 पर्यंत योजना पूर्ण होणार होती. परंतु त्यानंतर या योजनेत पुरेसा निधी न मिळाल्यामुळे ही योजना रखडत गेली. आता  110 कोटींची योजना 1 हजार 16 कोटींवर गेली आहे. 

या योजनेस सन 2010 मध्ये पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली आहे. या योजनेसाठी ऑक्टोबर 2010 अखेर 55.29 कोटी खर्च झाला आहे. या योजनेसाठी सन 2010-11 मध्ये 10.05 कोटींची तरतूद होती. 

योजनेसाठी टप्पा 1 व 2 च्या पंपगृहांना वीजपुरवठा करण्यासाठी रिळे उपकेंद्रातून वीज उपलब्ध झाली आहे. यासाठी 47 लाख रुपये वीज वितरण कंपनीकडे जमा झाला त्यामुळे काम पूर्ण झाले. वाकुर्डे रेड या 28 कि.मी. लांबीच्या कालव्यासाठी आता 66 कोटींची गरज आहे. बादेवाडी- बिऊर कालव्यासाठी 2.50 कोटी खर्च झाला. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे 12.50 कोटींची गरज आहे.

फायदा मोरणा नदीकाठावर...

वाकुर्डेचे पाणी खिरवडेतून, हात्तेगाव पंप हाऊसमधून कमरजाई धरणात आले, की तेथून ते मोरणा धरणात येते. त्यामुळे मोरणा धरण व त्या नदीकाठच्या लोकांना वाकुर्डेचा मोठा फायदा झाला आहे. मोरणा धरणावरील उपसाबंदी उठविण्यासाठी आमदार शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक यांनी वारंवार आंदोलने केली.

वाकुर्डे योजना पूर्ण करण्याचे भाजप-सेना सरकार पुढे आव्हान आहे. कारण केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार  आहे. रखडत गेलेली योजना पूर्ण करण्यासाठी सुमारे 1016.31 कोटींची गरज आहे. या योजनेची कामे कराड तालुक्यात जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र शिराळा-वाळवा तालुक्यात अपूर्ण आहेत.  ही कामे पूर्ण झाली तर हरितक्रांती होणार आहे. तालुक्यात बागायतीबरोबरच ऊस पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.

शिराळा-वाळवा तालुक्यामध्ये वाकुर्डे योजनेमुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बागायती व रब्बी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. वाकुर्डेचे पाणी आता कालव्याऐवजी बंद पाईपमधून मिळणार असल्यामुळे शेतकर्‍यांची जमीनही आता या योजनेत जाणार नाही.