Sat, Jul 04, 2020 01:57होमपेज › Sangli › शाळांच्या दर्जाला राजकारणाचे ‘ग्रहण’

शाळांच्या दर्जाला राजकारणाचे ‘ग्रहण’

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 9:30PMइस्लामपूर : सुनील माने

समाजाचा शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊ लागला आहे.  मात्र बर्‍याचवेळा शिक्षकांची परिस्थिती  व  वस्तुस्थिती समाजासमोर येत नाही. परिणामी विनाकारण शिक्षकांवर समाजमनाचा रोष ओढवतो. एकीकडे शाळांमध्ये  विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. तर याचवेळी शिक्षकांमधील हेवेदावे, राजकारण आदींमुळे  शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावू लागला आहे. शिक्षक शाळेत वेळेवर येत नाहीत, शाळेत शिकवत नाहीत. आमच्या मुलाला लिहिता, वाचतासुद्धा येत नाही. शिक्षक फक्त बसून पगार घेतात. अशा अनेक आरोपांना  बर्‍याचवेळा  शिक्षकांना सामोरे जावे लागत असते. या ना त्या कारणाने विनाकारण समाजाचा रोष शिक्षकांवर येत असतो. 

शिक्षकांचं राजकारण 

एखादा अपवाद वगळता बहुसंख्य शाळांमध्ये  शिक्षकांचे दोन-तीन गट असतात. एक गट हा प्रामाणिकपणे आपले ज्ञानदानाचे काम करत असतो. त्यामुळे या वर्गाला ना मुख्याध्यापकांची भीती, ना अधिकार्‍यांची ना संस्था चालकांची!  दुसरा वर्ग शिकवण्यास मध्यम किंवा चालढकल करणारा. परंतु हा वर्ग मुख्याध्यापक तसेच अधिकारी, संस्थाचालकांच्याजवळ सारखा उठबस करणारा असतो. आपणच कसे चांगले असे भासवण्याचा प्रयत्न करत असतो. तर तिसरा वर्ग कोणाच्याही भानगडीत न पडता केवळ काम करणारा असतो. मात्र दुसर्‍या वर्गाचा त्रास हा प्रामाणिक काम करणार्‍या शिक्षकांवर होत असतो. कारण हा दुसरा वर्ग मात्र चांगलाच चलाख असतो. एखाद्या शिक्षकांनी यांना विरोध केला की त्या शिक्षकांवर अनेक प्रकारे कुरघोड्या केल्या जातात.  गावातील काहींना  हाताला धरून किंवा विद्यार्थ्यांना उठवून किंवा मुख्याध्यापक, पदाधिकार्‍यांचे कान  भरून त्या शिक्षकाला बदनाम केले जाते. याचासुद्धा परिणाम पटसंख्या कमी होण्यावर होत आहे. कारण पालकांचे व विद्यार्थ्याचे या सार्‍या घटनेवर बारकाईने लक्ष असते.

पट वाढविण्यासाठीची उदासीनता..

ज्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता आहे. त्यांची कमी पटसंख्येमुळे बदली होणे किंवा अतिरिक्त होणे क्रमप्राप्‍त असते. हा नियम प्रत्येक शिक्षकाला माहीत असतो. त्यामुळे जो अतिरिक्त होत असतो तो शिक्षक  आपले पद राखण्यासाठी  पट वाढविण्यासाठी धडपडत असतात. बहुसंख्य शाळांमध्ये आपली शाळा टिकली पाहिजे, पट वाढला पाहिजे, सहकार्य केले पाहिजे हा दृष्टिकोन न ठेवता तो शिक्षक अतिरिक्त कसा होईल याचा प्रयत्न केला जातो. काही वेळेस विद्यार्थ्यांना, बर्‍याचवेळा पालकांना देखील व्यवस्थित न बोलणे या कारणामुळे पटसंख्येवर  परिणाम होत आहे. 

मुख्याध्यापक, अधिकारी वर्ग, शाळांचे संस्थापक यांनी आपल्या जवळच्या, खास गोटातील शिक्षकांवर कितपत विश्‍वास ठेवावा हे ठरविणे गरजेचे आहे. या  काही शिक्षकांमुळे चांगले ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांना मात्र मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. यासाठीच सर्वांनीच संघटितपणे प्रयत्न केले तर अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍न संपण्यास वेळ लागणार नाही.