Wed, Jul 15, 2020 15:56होमपेज › Sangli › सांगलीत सट्टा बाजार तेजीत!

सांगलीत सट्टा बाजार तेजीत!

Published On: Apr 11 2019 2:10AM | Last Updated: Apr 10 2019 10:54PM
सांगली : अभिजित बसुगडे

लोकसभा निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यात चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. त्याबरोबरच सट्टा बाजारातील लगबग सुरू झाली  आहे. सांगलीत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सट्टा बाजार तेजीत आहे. उमेदवाराच्या राजकीय वातावरणानुसार दररोज त्यांच्यावर लावल्या जाणार्‍या सट्ट्याच्या दरात बदल होत असल्याचेही दिसून येत आहे. 

सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. आयपीएल आणि सट्टा यांचे गणित फार जुने आहे. मात्र सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचाच फिव्हर असल्याचे दिसून येते. आयपीएल आणि निवडणुका यामुळे सट्टा बाजारातील हालचाली गतीमान झाल्या आहेत. दोन्हींतून पैसे कमावण्यासाठी बुकी सरसावले आहेत. त्यांचे पंटरही दिवसरात्र कामाला लागले आहेत. 

क्रिकेट आणि निवडणूक असा दोन्हींचा सट्टा घेताना बुकींसह एजंटांची चांगलीच धावपळ होत आहे. तरीही त्यातून चांगली कमाई होत असल्याने बुकींची पाचही बोटे तुपात आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रात कोणाची सत्ता येणार, कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येणार यासह चुरशीने होणार्‍या लढतीत कोणता उमेदवार किती मतांनी निवडून येणार यावर सध्या सट्टा जोरात असल्याचे सांगण्यात आले. 

स्टार प्रचारकांच्या सभा, मतदारसंघातील वातावरण, दलबदलूंचे पक्षप्रवेश अशा घटना झाल्यानंतर  सट्ट्याचे दर बदलतात. त्याशिवाय सट्टा बाजारात मतदारसंघनिहाय विजयाचे दावेदार असलेल्यांमध्ये वारंवार बदल होत आहेत. कोणत्या पक्षाचे   किती खासदार निवडून येतील यावर सर्वाधिक सट्टा खेळला जात असल्याचे चित्र आहे. 

आयपीएलचा बाजारही तेजीतच

यावर्षी आयपीएलच्या हंगामातच लोकसभा निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या सट्ट्यासोबतच आयपीएलचा सट्टा बाजारही जोमात असल्याचे चित्र आहे. मात्र आयपीएलवर सट्टा लावणार्‍यांपेक्षा निवडणुकीवर सट्टा लावणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे बुकींचे म्हणणे आहे. शिवाय आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर मेअखेरीस मतमोजणी होणार असल्याने निवडणुकीचा सट्टा मेपर्यंत चालणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील सट्ट्याच्या दरात चढ-उतार

सांगलीत  भाजपचे  खासदार संजय पाटील यांना स्वाभिमानी पक्षाच्या विशाल पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. बहुजन वंचित आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनी या दोघांनाही आव्हान दिले आहे. त्याशिवाय अपक्षही मैदानात आहेत. त्यामुळे चुरशीची  लढत होत आहे. प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. त्यामुळे आता  सांगली मतदारसंघाच्यानिकालाबाबत सट्टा बाजार तेजीत आहे. उमेदवारांच्या विजयाच्या दाव्याबाबतच्या रोज चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे.