Fri, Sep 20, 2019 22:30होमपेज › Sangli › अकरावेळा खासदारकी; सांगलीसाठी काय केले? 

अकरावेळा खासदारकी; सांगलीसाठी काय केले? 

Published On: Apr 21 2019 1:42AM | Last Updated: Apr 21 2019 1:42AM
सांगली : प्रतिनिधी

वसंतदादांच्या नावाच्या संस्था संपविल्या. कारखाना चालवायला देऊन अभिमान बाळगणार्‍या विशाल पाटील यांच्या घरात 11 वेळा खासदारकी मिळाली, पण त्यांनी सांगलीसह जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेसाठी काय केले? कोणते प्रश्‍न मार्गी लावले, असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी केला. येथील ऐतिहासिक मारुती चौकात कित्येक वर्षांनी शनिवारी भव्य प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार संभाजी पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार नितीन शिंदे, सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, डी. के. पाटील, रमेश भाकरे, सुरेश आवटी अजितकुमार आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, विशाल पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादांचा नातू म्हणून मत मागत आहे. त्यांनी कारखाना चालवायला दिला, पण कामगारांना देशोधडीला लावले आहे, अद्याप कामगारांचे भविष्य निर्वाह निधीसह सर्व देणी दिली नाहीत. कामगारांना टाचा घासून मरण्याची वेळ आली आहे. दुसरे जाती-पातीचे कार्ड घेऊन निवडणुकीत उतरले आहेत. त्यांचा पूर्वइतिहास काय? जनतेसाठी त्यांनी काय केले? आता एमआयएमचे ओवेसी  यांच्या नावे लढत आहेत. ओवेसींचा जातीधर्माचा विखारीपणा मी संसदेत अनुभवला आहे. यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. ते भूलभूूलैय्या व अफवांचे पीक पसरत आहेत. या विरोधकांना जनता खड्यासारखे बाजूला काढेल.

पृथ्वीराज देशमुख म्हणाले, भाजपने जिल्ह्यात यश मिळविले तरी वृक्ष लावणारे संभाजी पवार यांची उणीव होती. त्यांच्या पाठबळामुळे आता संजय पाटील यांना जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळेल.

नितीन शिंदे म्हणाले, वसंतदादा कारखाना, वसंतदादा बँक, वसंतदादा बँक बुडवून विशाल पाटील निवडणुकीत उतरले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी महापालिकेचे, कर्मचार्‍यांच्या ठेवीचे पैसे परत द्यावेत. संभाजी पवार यांच्या पाठबळाने खा. पाटील विजयी होतील.

गौतम पवार म्हणाले, काँग्रेसविरोधात 1984 पासून संभाजी पवार यांनी आवाज उठविला. तेव्हापासून मारुती चौक गाजवत ठेवला आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सभा येथेच झाल्या.  आजही या सभेचा संकेत तोच आहे. यावेळी अनेक रिक्षा संघटना, रामोशी-बेरड, कोलाटी समाजाने पाठिंबा दिला.
शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, विजय घाडगे, सुब्राव मद्रासी आदींसह मान्यवर उपस्थित होते.