Mon, Jul 06, 2020 23:36होमपेज › Sangli › सांगली विधानसभेसाठी मैदानात उतरणार

सांगली विधानसभेसाठी मैदानात उतरणार

Published On: Jan 28 2019 1:08AM | Last Updated: Jan 28 2019 1:08AM
सांगली : प्रतिनिधी

आठ दिवसांपूर्वी सांगलीतील कार्यकर्त्यांनी विधानसभा लढवण्याविषयी आग्रह केला होता. कार्यकर्त्यांचे मन जाणून घेतल्यानंतर आता सांगली विधानसभा लढवणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी करण्यात येईल, असे प्रतिपादन काँग्रेसच्या नेत्या जयश्री मदन पाटील यांनी केले. 

रविवारी जिल्हा परिषदेसमोरील विष्णूअण्णा भवन येथे दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मदनभाऊंनी नेहमीच कार्यकर्त्यांचे मन जाणून घेतले होते. म्हणून जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी मेळावा घेतला आहे. मदनभाऊंप्रमाणेच मीही शेवटच्या श्‍वासापर्यंत कार्यकर्त्यांसोबत रहाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भाऊंसारखेच स्वाभिमानी रहावे असे आवाहनही त्यांनी केले. 

यावेळी बुधगावचे अनिल डुबल म्हणाले, मदनभाऊंनी लढवलेल्या निवडणुकांचा निकाल पाहता. त्यांना मिळणारी मते पक्की आहेत. विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. सर्वांनी भाऊंच्या समाधीवर जाऊन जयश्रीताईंना निवडून आणण्याची शपथ घ्यावी. प्रा. शिकंदर जमादार, डॉ. नामदेव कस्तुरे, रत्नाकर नांगरे, माजी महापौर हारूण शिकलगार, नगरसेवक करीम मिस्त्री, सुभाष खोत, वसंतदादा बँकेचे माजी उपाध्यक्ष नरसगोंडा पाटील यांच्या कार्यकर्त्यांची भाषणे झाली. 

माजी महापौर किशोर जामदार म्हणाले, मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा जयश्रीताईंना उमेदवारी मागण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला आहे. त्यांच्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागण्यात येणार आहे. हा मेळावा काँग्रेसमधील कोणत्याही इच्छुक उमेदवाराच्या विरोधात नाही. लोकसभेसह विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार निवडून आणायचे असल्यास नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पाडापाडीचे राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, माजी महापौर कांचन कांबळे, मार्केट कमिटीचे सभापती दिनकर पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक उमेश पाटील, नगरसेवक फिरोज पठाण, वर्षा निंबाळकर, रोहिणी पाटील, अभिजित भोसले, अमर निंबाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक संतोष पाटील यांनी आभार मानले. 

पक्ष देईल तो निर्णय मान्य : जयश्री पाटील

सांगलीतील विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागण्यात येणार आहे. पक्ष देईल तो निर्णय मान्य असेल. कार्यकर्त्यांनी लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहावे. पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी रहावे. पक्षातील ज्येष्ठ नेते आता नाहीत त्यामुळे वसंतदादांचा, काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. काँग्रेसमध्ये गट-तट नाहीत. आम्ही एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे जाऊ, असेही जयश्री पाटील यांनी यावेळी सांगितले. 

पाटलांनी वाड्यावर भांडणे मिटवावी : नायकवडी

मदन पाटील यांच्यामुळेच आमचा काँग्रेस प्रवेश झाला. वसंतदादा घराण्यातच लोकसभा आणि विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी आहे. प्रतीक, विशाल पाटील यांच्याशी तुमचे काय आहे माहीत नाही. मदनभाऊ त्या दोघांनाही मुलाप्रमाणे मानत होते. तुम्ही ज्येष्ठ आहात त्यामुळे तुम्हीच पुढाकार घ्या. विजय वाड्यावर बसा किंवा साई वाड्यावर बसा पण तुमच्या तीनही पाटलांचे जे असे असेल ते मिटवावे असे आवाहन नगरसेविका वहिदा नायकवडी यांनी यावेळी जयश्री पाटील यांना केले.