Mon, Sep 16, 2019 06:15होमपेज › Sangli › सांगलीत प्रेयसीच्या मुलीचा खून; प्रियकराला चार दिवस कोठडी

सांगलीत प्रेयसीच्या मुलीचा खून; प्रियकराला चार दिवस कोठडी

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 23 2018 11:04PMसांगली : प्रतिनिधी

अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या पाच वर्षीय बालिकेला केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाला. याप्रकऱणी सोन्या ऊर्फ सोहम भोसले याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

याप्रकरणी मृत मुलीचे वडील संदीप काकडे याने फिर्याद दिली आहे. संदीपचा पत्नीशी वाद झाल्याने काही महिन्यांपासून ते विभक्त रहातात. त्याची पत्नी चारही मुलींसोबत पाटणे प्लॉट परिसरात रहाते. यातील संशयित सोन्या भोसले आचारी काम करतो. त्याची व संदीपच्या पत्नीची ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. 

सोमवारी (दि. 18) रात्री नऊच्या सुमारास सोन्या तिच्या घरी गेला होता. त्यावेळी संदीपची पत्नी पैसे आणण्यासाठी भावाकडे गेली होती. त्यावेळी तिच्या चारही मुली आणि सोन्याच घरात होते. पूर्वा झोपत नसल्याने त्याने तिला उठविले. तिला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर ती झोपी गेली. त्यानंतर काहीवेळाने ती बेशुद्ध पडली. नंतर शेजार्‍यांच्या मदतीने तिला सिव्हील हॉस्पीटलला नेले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला होता.

रात्री उशिरा उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.  उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर शहर पोलिसांना पूर्वाच्या मृत्यूबाबत शंका निर्माण झाली. अहवालानुसार तिच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला गती देऊन संशयित सोन्या भोसलेला ताब्यात घेऊन अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दि. 26 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.