Thu, May 23, 2019 22:18
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › सांगली स्वाभिमानीकडे; इंद्रजित देशमुख लढणार ?

सांगली स्वाभिमानीकडे; इंद्रजित देशमुख लढणार ?

Published On: Mar 15 2019 1:46AM | Last Updated: Mar 15 2019 1:46AM
सांगली : प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा अखेर स्वाभिमानी आघाडीला देण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. या जागेवर माजी सनदी अधिकारी आणि प्रसिद्ध वक्ते इंद्रजित देशमुख हे निवडणूक लढवतील, असे खात्रीशीर वृत्त आहे. स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चर्चा झाली असून चव्हाण यांनी या प्रस्तावाला संमती दिल्याचेही समजते.

सांगलीत  काँग्रेसतर्फे लढण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याशिवाय कोणीही तयार नसल्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींनी  हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीही  हातकणंगलेप्रमाणेच सांगली मतदारसंघही स्वाभिमानीला देण्यास पूर्ण अनुकूलता दर्शवली आहे.  एवढेच नव्हे तर भाजप-शिवसेना आघाडीने लोकसभेची एकही जागा न दिल्याने नाराज असलेले मंत्री महादेव जानकर महाआघाडीत आल्यास  त्यांना माढा मतदारसंघाची उमेदवारी देण्यासही काँग्रेस-राष्ट्रवादीने अनुकुलता दर्शवली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येते. 

सांगली लोकसभा मतदारसंघात आमदार डॉ. विश्‍वजित कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, युवा नेते विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील अशी चार नावे काँग्रेसतर्फे चर्चेत होती. विश्‍वजित कदम किंवा विशाल पाटील यांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरावे अशी काँग्रेस श्रेष्ठींची इच्छा व आग्रह  आहे. मात्र त्या दोघांनीही लोकसभेची निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच प्रतीक पाटील यांनीही ते फारसे इच्छुक नसल्याचे सांगितले आहे.  त्यामुळे अखेर भाजपला टक्कर देण्यास स्वाभिमानी संघटनेचे इंद्रजीत देशमुख हेच योग्य उमेदवार ठरतील अशा निष्कर्षाप्रत महाआघाडीचे नेते आले आहेत. त्यासंदर्भात अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

खासदार शेट्टी यांनी चार जागा मागितल्या होत्या. ते देणे शक्य नसल्याने त्यांना दोन जागा देण्याचे ठरले आहे. हातकणंगलेची जागा त्यांना महाआघाडीने दिली आहेच, आता सांगलीची जागाही त्यांना द्यावी असा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. इंद्रजीत देशमुख हे सांगली जिल्ह्यातील माहुली ( ता. खानापूर) येथील मान्यवर देशमुख घराण्यातील आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द चांगली आहे. ते प्रभावी वक्ते आहेत. शिवाय जयंत पाटील यांचे जवळचे नातेवाईकही आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला राष्ट्रवादीतूनही अनुकुलता आहे, असे समजते. दरम्यान अपेक्षेनुसार  लोकसभेची जागा  न मिळाल्यामुळे   महायुतीतील महादेव जानकर हे नाराज आहेत. त्यामुळे ते महाआघाडीत आले तर त्यांना माढ्याची जागा देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते अनुकुल आहेत. त्यासंदर्भात खासदार शेट्टी यांच्याबरोबर दोन्ही पक्षांच्या नेत्याची चर्चा झाली असून शेट्टी यांनीही जानकर यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे सांगण्यात येते. 

भाजपमध्येही उमेदवारीचा घोळ

दरम्यान सांगलीत भाजपच्या गोटातही  उमेदवार निश्‍चितीचा घोळ अजून सुरू आहे. संजय पाटील यांच्या नावाला भाजपमधील काही आमदार आणि नेत्यांनीही विरोध दर्शवला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे नावही त्यामुळे सांगलीच्या उमेदवारीसाठी पुढे आहे. महाआघाडीच्या निर्णयावरही भाजपचा निर्णय बराचसा अवलंबून असल्याचे सांगण्यात येते. संजय पाटील की, देशमुख हा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे समजते.