Wed, Jul 08, 2020 16:27होमपेज › Sangli › काँग्रेसला विश्‍वासात घेऊन सांगलीत उमेदवारी द्यावी : प्रकाश आवाडे

काँग्रेसला विश्‍वासात घेऊन सांगलीत उमेदवारी द्यावी : प्रकाश आवाडे

Published On: Mar 30 2019 1:31AM | Last Updated: Mar 29 2019 11:45PM
कोल्हापूर : प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा निर्णय काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आला आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने आम्ही ही जागा काँग्रेसकडे रहावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण आता खा. राजू शेट्टी यांनी सांगलीला उमेदवारी देताना स्थानिक काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकत्यार्ंंना विश्‍वासात घेऊन द्यावी असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले. मुलगा  राहुल हा हातकणंगलेतून निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाध्यक्ष आवाडे म्हणाले, खा. राजू शेट्टी यांचा अर्ज भरताना मी अनुपस्थित होतो हे खरे आहे. त्यांनी मला अर्ज भरण्यासाठी यावे असा निरोप दिला होता; पण सांगलीची जागा काँग्रेसकडे रहावी यासाठी मी प्रयत्न करत होतो. यासाठी मी पक्षश्रेष्ठींकडे गेलो असल्याने मी अनुपस्थित राहिलो होतो.  परंतु, खा. शेट्टी यांच्या  येडेमच्छिंद्र येथे झालेल्या प्रचार शुभारंभास मला निमंत्रण नव्हते. पण ते अनावधानाने झाले असल्याने आम्ही याबाबत नाराज नाही.  खा. शेट्टी यांच्यासह खा. धनंजय महाडिक व सांगलीची जागा अशा तीन जागा कोणत्याही स्थितीत निवडून आणणार असल्याचेही ते म्हणाले. 

पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसला विधानसभेत घवघवीत यश मिळवण्यासाठी लोकसभेला जास्त जागा लढवाव्यात अशी माझी भूमिका होती. त्यामुळेच सांगलीचा आग्रह होता. मी. खा. शेट्टींना सांगितले आहे की आता स्वाभिमानीला जागा दिली म्हणजे ती कायमची नव्हे. कारण इथे काँग्रेसची ताकद आहे. एका प्रश्‍नावर ते म्हणाले,  दादा घराण्यातील कोणीही भाजपमध्ये जाणार नाही. पत्रकार परिषदेस राहुल आवाडे उपस्थित होते.

आ. सतेज पाटील यांची जखम एका ड्रेसिंगवर भरणारी नाही

आ. पाटील  व खा. महाडिक यांच्या वादाबाबत पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता आवाडे म्हणाले, आ. पाटील यांची जखम खोलवर आहे. ती एका ड्रेसिंगने बरी होणारी नाही. त्यामुळे अजून दुखणं उरलं आहे. पण हे दुखणं दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या पाटील यांची नाराजी आहे हे खरे आहे.