Tue, Jul 14, 2020 04:36होमपेज › Sangli › सर्वांच्याच गळा; बंडखोरांच्या माळा!

सर्वांच्याच गळा; बंडखोरांच्या माळा!

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 8:22PMसांगली : सुनील कदम

महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या हजारांवर उमेदवारांची संख्या विचारात घेता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख तीन पक्षांतील इच्छुक उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे दिसून येत आहे. संधी न मिळालेल्या या तीन पक्षांतील इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळेच महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी झाली आहे. ही बाब विचारात घेता ऐन निवडणुकीत या तीन प्रमुख पक्षांना आपापल्या पक्षातील नाराज आणि बंडखोरांमुळे मोठी किंमत मोजावी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे हवशा-गवश्या उमेदवारांचे अर्ज विचारात घेता येत्या एक-दोन दिवसात उमेदवारांच्या घाऊक खरेदी-विक्रीचा बाजार चांगलीच तेजी गाठण्याची शक्यता आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापल्या पक्षातील बंडखोरीचा भाजपला फायदा होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आघाडीची चर्चा आणि जागावाटपाचा घोळ ताणत ठेवला होता. दोन्हीही पक्षांनी आपापल्या गोटात नेमके काय चालले आहे, हे विरोधकांना तर दूरच पण स्वत:च्या पक्षातील इच्छुक उमेदवारांनासुध्दा कळू दिले नाही. मात्र आघाडी आणि जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यावर पोहोचण्यापूर्वीच या दोन पक्षातील अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्जसुध्दा भरून टाकलेले होते. आघाडीच्या आणि जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात यापैकी अनेकांचा पत्ता कट झालेला आहे. मात्र असा पत्ता कट झालेली ही मंडळी सहजासहजी माघार घेतील अशी चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. त्यापैकी काही नाराजांनी पहिल्या दिवसापासूनच बंडखोरीचा झेंडा खांद्यावर घेतल्याचे दिसत आहे. त्यांचे बंड शमविण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आता फार मोठी यातायात करावी लागणार आहे.  

जरी ही निवडणूक भाजप विरूध्द आघाडी अशी दिसत असली तरी शिवसेना, शहर सुधार समिती आणि काही अपक्ष उमेदवारांचा विचार करता या निवडणुकीचे स्वरूप चौरंगी आणि पंचरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्वरूपाच्या निवडणुकीत एकेका मताला निर्णायक महत्व असते. बंडखोर आणि किरकोळ उमेदवारांनी खाल्लेली हाताच्या बोटावर मोजण्याएवढी मतेसुध्दा भल्याभल्या दिग्गजांना पाणी पाजायला पुरेशी ठरतात. ही बाब विचारात घेवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपापल्या पक्षातील नाराज आणि बंडखोरांच्या नाकदुर्‍या काढाव्या लागणार आहेत.

भाजपमधील जुन्या आणि निष्ठावान लोकांचा सुरुवातीपासून आयारामांना उमेदवारी देण्यास विरोध होता. मात्र सत्तेचा सारीपाट मांडण्याच्या नादात भाजपच्या नेत्यांनी त्याकडे सोयीस्कर कानाडोळा करून अनेक आयारामांसाठी उमेदवारीच्या पायघड्या घातल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे काही निष्ठावंतांना डावलल्याचेही दिसत आहे. अशा मंडळींनी पक्षाची आजपर्यंतची ‘परंपरा’ बासनात गंडाळून ठेवून बंडाचा झेंडा फडकावल्याचे दिसत आहे. भाजपच्या नेत्यांनी सुरुवातीला अपेक्षा केल्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील आयाराम भाजपच्या गळाला लागले नसले तरी जे आयाराम ऐनवेळी आलेत, त्यांच्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना पक्षाच्या काही निष्ठावंतांमध्ये बळावल्याचे दिसत आहे. भाजपमधील ही नाराज मंडळी भाजपच्या सत्तासोपानाला फार मोठा अडथळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या जरी हजारांच्या घरात दिसत असली तरी सगळेच काही निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरलेले नाहीत. यापैकी अनेकजण निवडणूक मैदानात  आपले राजकीय वजन अजमावण्यासाठी उतरलेले दिसत आहेत. अशा उमेदवारांच्या  हालचालींना जोर येण्याची चिन्हे आहेत. प्रत्येक प्रभागात निवडणूक ही चुरशीची असल्यामुळे आणि एकेका  मताला निर्णायक मूल्य प्राप्त होणार असल्यामुळे  दिवसागणिक अशा उमेदवारांच्या किंमती खालवर होताना बघायला मिळणार आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरपर्यंत खरेदी-विक्रीचा हा खेळ रंगलेला बघायला मिळेल. 

यावेळच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप  सर्व जागा लढवीत आहे, तर आजपर्यंत स्वबळावर सर्व जागा लढविणार्‍या दोन्ही काँग्रेसना आघाडी करण्याची वेळ आली आहे. शिवसेनासुध्दा या निवडणुकीत पहिल्यांदाच आपले स्वबळ अजमावण्यासाठी उतरलेली दिसत आहे. याशिवाय गेल्या चार-पाच वर्षांतील कालावधीत महापालिकेतील भ्रष्टाचाराला खर्‍या अर्थाने वाचा फोडणारी शहर सुधार समितीसुध्दा थेट मैदानात उतरून सत्ताधार्‍यांसह भाजप-सेनेला आव्हान देण्यास सज्ज झालेली दिसत आहे.

या निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा काय असणार आहे, हाही तितकाच महत्वाचा विषय ठरणार आहे. काँग्रेसने दीर्घकाळ पालिकेची सत्ता उपभोगलेली आहे, तर राष्ट्रवादीनेही काही कालावधीसाठी महापालिकेवर  कारभाराची मोहोर उमटवली होती.  या दोन्ही पक्षांच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचाराची आणि गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे गाजलेली आहेत. आता हेच दोन्ही पक्ष हातात हात घालून निवडणुकीला सामोरे जात आहेत.  

या पक्षाच्या नेत्यांकडून स्थानिक प्रश्‍नांऐवजी प्रामुख्याने राज्यातील आणि केंद्रातील भाजपच्या कारभारावर टीकेचा भडीमार केला जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना महापालिकेच्या कारभारावर तुटून पडणार यात शंकाच नाही. शहर सुधार समितीकडूनही महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढण्याची सिध्दता करण्यात आलेली दिसत आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील नाराज, बंडखोर मंडळी त्या-त्या पक्षांच्या निवडणूक अंदाजांना धक्का लावण्याची शक्यता दिसत आहे. सर्वच पक्षांना आणि भल्याभल्या उमेदवारांना आतापासूनच या आशंकेने ग्रासल्यामुळे नाराजांची नाराजी दूर करणे,  किंवा त्यांना आपल्या बाजूला वळवण्याची सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

जयंतनितीमुळे भाजपच्या मनसुब्यांना सुरूंग!

राजकारणात विळ्याभोपळ्याचे सख्ख्य असलेल्या आणि महापालिकेच्या राजकारणातही परस्परांचे उभे दावेदार असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मोहरे आपल्या गोटात दाखल होणार असल्याची हवा भाजपने केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साठमारीत आपले सत्ताकारण साधले जाईल, असा भाजपचा होरा होता. मात्र खालपासून वरपर्यंत भाजपला जोखून असलेल्या जयंत पाटील यांनी शेवटपर्यंत आपल्या चालींचा कोणाला थांगपत्ता लागू दिला नाही आणि अगदी ऐनवेळी आपल्या हातातील आघाडीचे पत्ते खुले करत  भाजपला त्यांची चाल करण्यासाठी उसंतसुध्दा मिळू दिली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आयारामांवर अवलंबून असलेल्या भाजपला  आहे त्या उमेदवारांची सांगड घालावी लागली. जयंत पाटील यांनी गोपनीयपणे एक एक चाली खेळल्यामुळे भाजपच्या पटावरील संभाव्य सत्तेची प्यादी पुढे सरकूच शकली नाहीत.