Fri, Sep 20, 2019 21:56होमपेज › Sangli › महापालिका निवडणुकीत शतप्रतिशत भाजपच 

महापालिका निवडणुकीत शतप्रतिशत भाजपच 

Published On: Feb 10 2018 1:36AM | Last Updated: Feb 09 2018 11:12PMसांगली : प्रतिनिधी

आतापर्यंत चाळीस वर्षांच्या राजकारणात माझा अंदाज आणि भविष्य कधीच चुकलेले नाही. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शतप्रतिशत भाजपचाच विजय होईल.   महापौरही भाजपचाच असेल, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. 

येथील भावे नाट्यगृहात बूथ पदाधिकार्‍यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ,   जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख  होते. 
ना. पाटील म्हणाले, यापूर्वीही मी अनेक निवडणुकीसह मुंबई महापालिका भाजपच जिंकणार असा दावा केला होता. यावर विरोधकांनी ‘मी ज्योतिषी आहे का’ अशी थट्टा केली होती.  खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मुंबई महापालिका निवडणुकीत माझा अंदाज योग्य असल्याचा अनुभव आला. आतापर्यंत 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत प्रत्येक निवडणुकीत बूथबांधणीपासून जनतेपर्यंत पोहोचून सर्व्हेद्वारे अंदाज घेण्याचे काम केले आहे.

ते म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांचाही नागपूरच्या एजन्सीमार्फत आम्ही सर्व्हे केला आहे. तो माझ्याकडे तयारही आहे. पुढे 3-4 महिन्यांत अजूनही प्रगती दिसून येईल. बूथमार्फत अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी घरा-घरापर्यंत पोहोचावे. बहुरंगी निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे एका बूथमधून आपल्याला 1100 पैकी 30 ते 35 टक्केच मतांची गरज लागणार आहे. 

पाटील म्हणाले, ही बूथची बांधणी फक्त महापालिकेपुरतीच नव्हे तर पुढे लोकसभा, विधानसभा निवडणूकीतही उपयोगी ठरणार आहे. तेवढ्याच मतांवर लोकसभा, विधानसभेची निवडणूकही आपणच जिंकणार आहोत. 

 पोस्टर लावून मते मिळत नाहीत
ते म्हणाले, वाढदिवसानिमित्त पोस्टर लावून जनता मते देत नाही.  मात्र जनतेतील प्रतिष्ठित, कार्यकर्त्यांचे वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी जोरात करायची योजना करा. प्रत्येक प्रभागात शुद्ध पाण्याचे एटीएम बसवा. जमले तर मोफत करा, पण त्याने जनतेला मोल कळणार नाही. त्याऐवजी नाममात्र शुल्क ठेवा. जनतेला शुद्ध पाण्याची गरज असून, त्याद्वारे मतदारांशी घरटी  संपर्क होईल.
भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे म्हणाले, बूथरचना ही पक्षासाठी आहे. कोणाच्या उमेदवारीसाठी लॉबिंग होणार नाही. यासंदर्भात  सांगलीत आमदार गाडगीळ आणि मिरजेत आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयात सोमवारी पुन्हा बैठक होईल. 

ते म्हणाले,भाजप युवामोर्चाच्या केंद्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन 22 फेब्रुवारीला पश्‍चिम महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सांगलीत 5 वाजता मेळावा होणार आहे. ती महापालिका निवडणुकीचीच मोर्चेबांधणी आहे.

प्रास्ताविकात माजी जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले, बूथ जिंकले की कोणतीही निवडणूक जिंकलीच. यादृष्टीने बूथरचना सुरू आहे. एक बूथसाठी आता दहा ऐवजी 30 कार्यकर्ते असतील. यामध्ये महिला, तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्ते असतील. यामध्ये आमदार, खासदार आणि कार्यकर्ते समानच आहेत. याप्रसंगी कुपवाडचे माजी नगराध्यक्ष मोहनसिंग रजपूत यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 प्रदेश उपाध्यक्षा सौ. नीता केळकर, माजी आमदार दिनकर पाटील, सरचिटणीस सुरेंद्र चौगुले, मुन्ना कुरणे, शहराध्यक्ष शरद नलावडे, हरिपूरचे सरपंच विकास हणबर, गणपतराव साळुंखे, पांडुरंग कोरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

28 जण येतील; पण उमेदवारीची अट नाही
काँग्रेस-राष्ट्रवादीचे 18 विद्यमान नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबद्दलच्या प्रश्‍नावर ना. पाटील म्हणाले, भाजपमध्ये दोन्ही काँग्रेसचे 18 च काय, 28 जणही येतील; पण त्यांना घेताना उमेदवारीची अट मान्य  करणार नाही. आम्हाला कोणाचेही वावडे नाही; पण लोकांत प्रतिमा चांगली असावी. उमेदवारीचा फैसला विनिंग मेरिटनुसार ज्या-त्यावेळेला  ठरेल.  महापालिकेची वाट लावणार्‍या आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍यांना पक्षात घेणार का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, लोकांत मते मिळणारी प्रतिमा असणे आवश्यक आहे. त्यांनी भ्रष्टाचाराबद्दल उत्तर देणे टाळले.