Mon, Jul 13, 2020 07:27होमपेज › Sangli › सांगली : शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंटा शिगेला    

सांगली : शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंटा शिगेला    

Published On: Aug 03 2018 8:17PM | Last Updated: Aug 03 2018 8:17PMसांगली : प्रतिनिधी


सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत सत्ता कोणाची येणार याबाबत मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांचीच उत्कंटा शिगेला पोहचली होती. प्रभाग क्रमांक सोळामध्ये काँग्रेस आणि भाजप उमेदवारांची मते खालीवर होत होती. अखेर दुपारी चार वाजता या प्रभागातून भाजपचे दोन उमेदवार निवडूण आल्याचे घोषीत झाले आणि भाजपची एकहाती सत्ता आल्याचे स्पष्ठ झाले.

सांगली जिल्हा हा आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषदेत भाजपने विजय मिळवल्यानंतर महापालिकेत काय होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती.  राष्ट्रवादीचे सर्वाधीक उमेदवार तर काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर आणि भाजप तिसर्‍या क्रमांकावर जाईल, असा अंदाज बहुतेक जाणकार  व्यक्त करीत होते. मात्र हा अंदाज महापालिकेतील जनतेने चुकीचा ठरवला.   

सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे 5 तर भाजपचे 3 उमेदवार आघाडीवर होते. दुपारी बारा वाजता काँग्रेस - राष्ट्रवादीचे 15 उमेदवार विजयी झाले. तर भाजपचे 8 उमेदवार विजयी झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा पुढे होती. मात्र दुपारी दोन नंतर निकालाचे चित्र बदलू लागले.  राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला प्रभाग आठ मधून विष्णू माने एकमेव निवडूण आले. मात्र राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, सोनाली सागरे हे  तीन भाजपचे उमेदवार निवडूण आले. त्यामुळे भाजप 19 तर आघाडीच्या 17 जागा विजयी झाल्या.  विश्रामबाग, गावभाग या परिसरातील दोन्ही प्रभागातून आठही उमेदवार विजयी झाल्याने भाजप  आघाडीच्या खूपच पुढे गेली. दुपारी तीन वाजता भाजपच्या 36 , राष्ट्रवादी 13 आणि काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे नेते आणि वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या घराच्या परिसरातील प्रभाग क्रमांक 11 मधून चारही उमेदवार काँग्रेसचे  विजयी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीला पाठीमागे ठाकून काँग्रेस पुढे गेली. त्यावेळी प्रभाग क्रमांक 18 मध्ये दोन भाजपच्या तर काँग्रेसच्या दोन जागा विजयी झाल्या. त्यामुळे भाजप 39 जागावर गेली. तर काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी 33 जागावर विजयी होऊन 4 जागावर आघाडीवर होती. त्यामुळे एक अपक्ष, एक स्वाभिमानी आघाडी यांना बरोबर घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीही सत्तेत येऊ शकते अशी चर्चा सुरू होती. दुपारी चार पर्यंत भाजपची एक हाती सत्ता येणार की नाही याबाबत उत्कंटा वाढलेली होती. प्रभाग क्रमांक 16 मध्ये सर्वात उशिरापर्यंत मोजणी सुरू होती. या प्रभागातील क गटातून भाजपच्या सुनंदा राऊत आणि काँग्रेसच्या रुपाली चव्हाण यांची मते सतत वर खाली होत होती. त्या शिवाय स्वाती शिंदे या पुष्पलता पाटील यांच्या मतातही सुरुवातीस फारसा फरक नव्हता. त्यामुळे भाजप 39 जागावरच राहणार की काय अशी शंका उपस्थित होत होती. मात्र शेवटच्या टप्यात या ठिकाणी भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आणि  महापालिकेवर एक हाती सत्ता आल्याचे स्पष्ठ झाले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.