होमपेज › Sangli › राजू शेट्टींना नडली आघाडीशी संगत

राजू शेट्टींना नडली आघाडीशी संगत

Published On: May 25 2019 2:10AM | Last Updated: May 24 2019 11:53PM
सांगली : प्रतिनिधी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर आघाडी  केल्याने झाल्याची चर्चा आता मतदारांत सुरू आहे. ऊस आंदोलनाची कमी केलेली तीव्रता, साखरसम्राटांच्या मांडीला-मांडी लावून बसणे शेतकर्‍यांना रुचले नसल्याचे बोलले जात आहे. तसेच काही प्रमाणात इतर फॅक्टरचाही प्रभाव असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. ऊस, दूध आंदोलनाच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी राज्यभर चळवळ उभी केली. साखरसम्राटांना हादरवून सोडणारे नेते म्हणून त्यांचा राज्य व देशभर लौकिक आहे. उपेक्षित कार्यकर्त्यांना जोडून त्यांनी राज्यभर शेतकरी संघटनेच्या चळवळीचा झंझावत उभा केला. त्या जोरावर त्यांनी आमदार व दोन वेळा खासदारपदाची निवडणूक जिंकली. 

गेल्या वेळी ते भाजपबरोबर होते.  यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर जाऊन ते निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात  शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी भाजप-महायुतीच्या मदतीने तगडे आव्हान निर्माण केले होते. तरीही शेट्टी हे हॅट्रिक करतील, असे सर्वांना वाटत होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव झाला. हा पराभव  राज्यात अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. हा पराभव का झाला यांच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने शेट्टी यांनी असंगाशी केलेला संग नडला असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी साखरसम्राटांशी केलेली आघाडी शेतकर्‍यांना रुचली नाही. कारण आजपर्यंत शेट्टी यांनी त्यांच्यावरच टिकेची झोड उठवून राजकारण केले. 

स्वाभिमानीच्या  अनेक कार्यकर्त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांनी मारहाण केली होती.  गुन्हे दाखल केले होते. पण शेट्टी यांनी त्यांच्याशीच जवळीक केल्याचे कार्यकर्त्यांना, शेतकर्‍यांना फारसे पचनी पडले नाही. याबाबत त्यांना जवळच्या अनेकांनी वारंवार सांगितले होते. पण राजकीय अपरिहार्यतेमुळे त्यांना  साखरसम्राटांबरोबर जावे लागले. सांगलीत तर त्यांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांना डावलून थेट साखर कारखानदारालाच उमेदवारी दिली होती. त्याची चर्चाही निवडणुुकीत जोरात झाली.  पण याची मोठी  किंमत  त्यांना  मोजावी लागली.  

याबरोबरच शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहुवाडी, इचलकरंजी येथे इतर पक्षांचे आमदार असल्याने याठिकाणी  विरोधी फॅक्टर जोरात चालले असल्याचे सांगण्यात येते. यासाठी अनेकांनी गुप्तपणे काम केले. त्यांना इस्लामपुरातून मोठी ताकद दिल्याचे बोलले जात आहे. तसेच शेट्टी यांना वाळव्याशी केलेल्या मैत्रीचा चांगला फटका बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शेट्टी  यांचा करेक्ट  कार्यक्रम  झाल्याची जिल्ह्यात  चर्चा सुरू आहे. 

सदाभाऊ खोत यांनी काढला वचपा  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बांधणीत राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांचे योगदान आहे. त्यामुळे शेट्टी यांनी खोत यांना भाजपबरोबर जमवून घेऊन मंत्रीपदी बसविले. पण यानंतर संघटनेत आपलेच स्थान मोठे असल्याचा इगो निर्माण झाल्याने दोघांत वितुष्ट आले. यानंतर खोत हे संघटनेसाठी आपण खस्ता खालल्याचे सतत सांगत होते. पण स्वाभिमानीचे कार्यकर्ते त्यांची खिल्ली उडवित होते. त्याचा मोठा राग खोत यांना होता. त्यामुळे त्यांनी शेट्टी यांच्या पराभवासाठी मोठी कंबर कसली होती. त्यासाठी मोठे डावपेच केले. शेट्टी यांचा पराभव करुन त्यांनी वचपा काढल्याची चर्चा सुरु आहे. 

सतत भूमिका बदलली ; स्वतंत्र लढायला हवे होते

शेट्टी यांनी आजपर्यंत सतत भूमिका बदलली. निवडून येण्यासाठी त्यांनी प्रत्येकवेळी कोणाशी तरी जमवून घेतले. गेल्या वेळी ते भाजपबरोबर होते. आता ते काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर गेले. तसेच अलिकडच्या दोन वर्षांत त्यांच्या ऊस आंदोलनातील आक्रमता कमी झाली होती. एफआरपीचे तुकडे,  ऐनवेळी आंदोलनातून माघार घेणे, दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली. मागील दोन-तीन वषार्ंत शेतकर्‍यांच्या उसाला समाधानकारक दर मिळाला नाही. त्याचा फटका त्यांना बसला. त्यांनी कोणाबरोबरही न जाता स्वतंत्र लढायला हवे होते, असे बहुसंख्य शेतकर्‍यांचे मत होते. पण याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

धैर्यशील माने        राजू शेट्टी

            इचलकरंजी

    1,24,837        49,907
           हातकणंगले
    1,18,688        73,221
            शिरोळ
    92,929        99,977
        शाहूवाडी-पन्हाळा
    93,921        72,051
          इस्लामपूर
    74,700        93,250
           शिराळा
    77,422        98,464