Sat, Jul 04, 2020 05:55होमपेज › Sangli › आर.आर.पाटील स्मारकाचे काम संथगतीने

आर.आर.पाटील स्मारकाचे काम संथगतीने

Published On: Jul 07 2019 1:29AM | Last Updated: Jul 06 2019 11:41PM
सांगलीः प्रतिनिधी

 माजी उपमुख्यमंत्री (स्व.) आर. आर. पाटील यांच्या येथील स्मारकाचे काम निधी असूनही रखडले आहे. त्याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे. त्यामुळे स्मारक होणार कधी, याकडे अनेकांचे लक्ष  आहे. 
(स्व.) पाटील यांच्या कार्याची आठवण रहावी, यासाठी येथील महात्मा गांधी वसतिगृहाजवळ  स्मारक उभारण्याची घोषणा युती सरकारने केली. त्यानुसार तीन कोटी रुपयांची तातडीने तरतूद 
केली. 

स्मारकाच्या जागेचा वाद संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये या स्मारकाचे भूमिपूजन अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले होते. त्यावेळी सर्वच पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यावेळी   मुनगंटीवार यांनी स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तातडीने कामे पूर्ण करा. मार्चनंतर आणखी निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही दिली होती.  तातडीने काम पूर्ण करून या स्मारकाच्या उद्घाटनासही मला बोलवा, असे त्यांनी सांगितले होते. 

मात्र या स्मारकाचे काम सध्या फारच संथगतीने सुरू आहे. त्याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.   स्मारकाच्या कामासाठी 9 कोटी 71 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. वीस गुंठे जागेवर हे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकांतर्गत तळमजल्यावर 15 हजार 602 चौरस फूट, पहिल्या मजल्यावर 9 हजार 522 चौरस फूट असे एकूण 25 हजार 124 चौरस फूट बांधकाम करण्यात येणार आहे. 

स्मारकाच्या पूर्व प्रवेशद्वारावर आर. आर. पाटील यांचा अर्धपुतळा आणि डिजिटल वॉल असेल. तळमजल्यावर 350 आणि पहिल्या मजल्यावर 150 खुर्च्याची  आसन व्यवस्थाही असणार आहे.   स्मारकात कलादालन, संग्रहालय असेल. त्या शिवाय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र  अशा सुविधा करण्याचे नियोजन आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू आहे.