Wed, Jul 08, 2020 04:21होमपेज › Sangli › आर. आर. पाटील राजकारणातील आदर्श : अर्थमंत्री मुनगंटीवार

आर. आर. पाटील राजकारणातील आदर्श : अर्थमंत्री मुनगंटीवार

Published On: Nov 17 2018 1:22AM | Last Updated: Nov 16 2018 10:55PMसांगलीः प्रतिनिधी 

राजकारण्यांची कातडी  गेंड्याची  असते असे म्हणतात. मात्र आर. आर. पाटील हे जनतेच्या हितासाठी खूप संवेदनशील होते.   सामान्यांच्या विकासाची त्यांना तळमळ होती. त्यांच्याकडे जे खाते सोपवले त्याचे त्यांनी सोने केले. असा आदर्श, लढाऊ, प्रेमळ आणि चारित्र्यवान नेता पुन्हा होणे नाही, असा गौरव  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे केला. 

येथील महात्मा गांधी वसतीगृहाच्या मैदानावर सुमारे 18 कोटी रुपये खर्चून माजी उपमुख्यमंत्री (स्व.) आर. आर. पाटील यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमीपूजन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सर्वश्री शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, अनिल बाबर, विलासराव जगताप,  मोहनराव कदम, सुमनताई पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आदि उपस्थित होते. 

ना. मुनगंटीवार म्हणाले, आर.आर.आबांच्या स्मारकासाठी निधीची मागणी कोणीच केली नव्हती, तरीसुद्धा    त्यांचे   विचार पुढील काळात कायम स्मरणात रहावे, यासाठी स्मारकाला निधी मी देण्याचा निर्णय घेतला. नक्षलवादी भागातील गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री   म्हणून त्यांनी आव्हान स्विकारले. त्याप्रमाणे त्यांनी कामही केले. त्यांच्या काळात भारनियमनाची घोषणा केल्यानंतर त्यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातील एसी बंद करुन खिडक्या उघडल्या. ते म्हणाले, ते राष्ट्रवादीचे नेते होते, मात्र राजकारणाच्या  पलिकडे त्यांनी स्नेह जपला. माझ्यासाठी तर ते विधीमंडळातील  मार्गदर्शक होते. विधानसभेतील त्यांची भाषणे ही ओठातून, मेंदूतून येत नव्हती तर ती हृदयातून येत असत. स्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान, डान्सबार बंदी, गुटखाबंदी यासारखे उपक्रम त्यांनी राबवले. 

ना. केसरकर म्हणाले, गृहमंत्री कसा असावा, याचे उत्तम उद्हारण आबा होते. त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्विकारल्यामुळे त्या परिसरातील एकही मुलगा नंतर  नक्षलवादी बनला नाही. जिल्हा परिषदांना जादा अधिकार त्यांच्यामुळे मिळाले. मोठ्या पदावर असूनही त्यांची मुले जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकली,यावरून त्यांचा साधेपणा लक्षात येतो. 

अजित पवार म्हणाले, आर. आर. पाटील हे राज्यातील साडेअकरा कोटी जनतेच्या मनातील नेते होते. कोणतेही सरकार असले की थोडे डावे - उजवे केले जातेच. मात्र सध्याच्या सरकारने ते केले नाही. त्यांनी त्यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर केला. दोन्ही काँग्रेस एकत्र असत्या तर आर. आर., जयंत पाटील यांच्यासारख्या गुणी नेत्यांना मंत्रिमंडळात मोठी संधी मिळाली नसती.   दिवंगत नेते विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आर. आर. आबा यांच्या अकाली जाण्यामुळे राज्याची फार मोठी हानी झाली आहे. 

जयंत पाटील म्हणाले, आबांचा विधिमंडळात प्रभाव होता. त्यांचे भाषण झाले आणि त्याची बातमी झाली  नाही, असे कधी झाले नाही. त्यांच्या स्वच्छता अभियानाचा आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा घेतला आहे. आबांनी राज्यात सुरू केलेल स्वच्छता अभियान आता देशभर राबवले जात आहे. 

खा. संजय पाटील म्हणाले, आर. आर. पाटील यांच्यावर ज्या जबाबदार्‍या सोपवल्या, त्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या. स्वकर्तृत्वाने त्यांनी राजकीय क्षेत्रात मोठी झेप घेतली.   दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणार्‍या या योजनांचे पूर्णत्व हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आमदार सुमन पाटील म्हणाल्या, लोकनेते म्हणून आर. आर. पाटील यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. तेथील दुर्गम भागापर्यंत विकासात्मक काम पोहोचवले. स्वच्छता, तंटामुक्त अभियानातून लोकांचे मन स्वच्छ करण्याचे काम केले. 

यावेळी आमदार अनिल बाबर, विलासराव जगताप यांचीही भाषणे झाली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी स्वागत आणि प्रास्तावीक केले. उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी आभार मानले. स्मारकाचे कंत्राटदार रणजीतसिंह मोहिते, वास्तूविशारद प्रमोद चौगुले आदी उपस्थित होते.  दरम्यान कार्यक्रमाच्या आधी उपस्थित नेत्यांनी आर.आर. आबा   वसतीगृहातील ज्या खोलीत राहत होते, त्या खोलीलाही भेट देऊन पाहणी केली. 

तर आर. आर. आबा मुख्यमंत्री बनले असते : पवार

अजित पवार म्हणाले,  ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ठरले होते.  सन 2004 मध्ये राष्ट्रवादीचे  अधिक आमदार निवडून आले होते. आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी उदार दृष्टिकोन ठेवला, अन्यथा  ठरलेल्या फॉम्युल्यानुसार  त्यावेळी आर. आर. आबाच मुख्यमंत्री झाले असतेे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमुळे आर.आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील असे गुणी नेते मंत्री होऊ शकले  हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 

अनेकांच्या भाषणातून आबांच्या आठवणी जाग्या

कार्यक्रमात ना. मुनगंटीवार यांच्या पासून  आमदार  बाबर यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी आबांच्या आठवणी सांगितल्या. या आठवणी सांगताना काहीजण भावविवश झाले होते.  या स्मारकाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. वेळेवर हे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही  ना. मुनगंटीवार यांनी दिली.