Tue, Nov 19, 2019 11:19होमपेज › Sangli › लेखी आदेशाशिवाय धावली पुणे-पंढरपूर गाडी

लेखी आदेशाशिवाय धावली पुणे-पंढरपूर गाडी

Published On: Jul 12 2019 1:58AM | Last Updated: Jul 11 2019 11:16PM
मिरज : प्रतिनिधी

आषाढी वारीनिमित्त पुणे-पंढरपूर विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली होती. परंतु या गाडीची लेखी  माहिती अन्य स्थानकांना कळविण्यात आली नव्हती. त्यामुळे  गुरुवारी ही गाडी धावत असतानाच पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील स्थानकातील अधिकारी व प्रवासी यांचा एकच गोंधळ उडाला.

मध्य रेल्वे पुणे विभागाने  आज पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधीत अधिकार्‍यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दिली  होती. परंतु कोणतेही लेखी आदेश दिले  नव्हते. 
व्हॉट्सअ‍ॅपवरील माहितीनुसार  ही विशेष गाडी ही दौंडमार्गे आहे, असे नमूद होते. त्यामुळे पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील स्थानकातील अधिकार्‍यांनी या व्हॉटसअप संदेशाकडे गांभीर्याने पाहिले नाही.  प्रत्यक्षात ही गाडी पुणे-मिरज मार्गावर धावू लागल्याने  रेल्वे स्थानकांवरील अधिकार्‍यांची तारांबळ उडाली.

पंढरपूर येथे जाण्यासाठी सांगली स्थानकात प्रवासी जमले होते.  विशेष रेल्वेगाडीचे तिकीट मागू लागले. परंतु या गाडीबाबत लेखी आदेश नसल्याने तिकीट द्यायचे की नाही, असा प्रश्‍न रेल्वे प्रशासनापुढे होता.  प्रवासी संघटनेच्या एका पदाधिकार्‍याने रेल्वे मंत्रालयाशी  ट्वीटर अकाउंटवर संपर्क साधला. त्यानंतर रेल्वेच्या पुणे विभागाची पळापळ सुरू झाली. 

ही गाडी पुणे-मिरज मार्गावरील प्रत्येक स्थानकातील कंट्रोल रुमला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज देतच पंढरपूरकडे रवाना झाली. 

पुणे विभागाकडून वारंवार चुका...

पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गावर धावणार्‍या पॅसेंजर गाड्या अनेक वेळा रद्द करण्यात येतात. मात्र त्याची कल्पना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत नाही. दिली तर विलंबाने देण्यात येते. काही वेळा गाडी सुरू असताना बंद आहे म्हणून तर बंद असताना ती सुरू आहे, असा संदेश दिला जातो. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो.