Tue, Jul 14, 2020 03:01होमपेज › Sangli › निवडणूक प्रचाराची लगीनघाई

निवडणूक प्रचाराची लगीनघाई

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 22 2018 9:24PMसांगली : शशिकांत शिंदे

महापालिका निवडणुकीचे मतदान आता दहा दिवसांवर आले आहे. आता प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्याला रविवारपासून सुरुवात झाली आहे. बुधवारपासून तिसरा टप्पा सुरू होईल. त्यामुळे प्रचाराची आता खरी रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचारासाठी कमी वेळ शिल्लक राहिल्याने उमेदवार, त्यांचे समर्थक, प्रचारक यांची प्रचारासाठी लगीनघाई सुरू झाली आहे. रविवारी सुटी, पावसाने थोडा व्यत्यय आणला तरी देखील रॅली, कोपरा सभा आणि भेटीगाठी यामुळे वातावरण ढवळून निघाले. सांगली, मिरज,  कुपवाड  महापालिका निवडणुकीसाठी दि. 1 ऑगस्टरोजी मतदान होत आहे.  दि. 30 जुलैरोजी सायंकाळी  पाच वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे.  त्यामुळे प्रचारासाठी आता आठ दिवसच उमेदवारांकडे शिल्लक राहिले आहेत.

महापालिकेत निवडून जाण्यासाठी अनेकांनी गेल्या काही वर्षांपासून तयारी सुरू केली होती. सामाजिक संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले. प्रभाग आणि आरक्षण  निश्‍चित झाल्यानंतर इच्छुकांनी सोईस्कर असे प्रभाग निवडले. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शक्‍तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. अनेक पक्ष आणि आघाड्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. उमेदवारांचे, त्या- त्या प्रभागातील पॅनेलचे आणि पक्षांचे जाहीरनामे आता प्रकाशित होतील. सर्वच पक्ष, आघाड्या आणि अन्य उमेदवारही आपलाच जाहीरनामा कसा चांगला हे सांगणार आहेत.

दरम्यान, छाननी प्रक्रिया संपल्यानंतर बहुसंख्य  उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. पक्षाच्या नेत्यांनी अर्ज माघार घेण्यासाठी रुसवे फुगवे दूर  करण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींनी माघार घेतली तर काहींनी उमेदवारी कायम ठेवली. प्रचार करण्यासाठी झेंडे, स्पिकर, रॅली, कोपरा सभा आदींचे परवाने घेण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी रविंद्र खेबुडकर आणि जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या.  कडक आचारसंहितेबाबत कैफियत  मांडण्यात आली.  खेबुडकर आणि जिल्हाधिकारी पाटील यांनी सर्वांच्याच तक्रारी ऐकून घेतल्या.

निवडणूक यंत्रणा अधिक तत्पर करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी देखील  बंदोबस्ताची पूर्ण तयारी केली आहे. बदलत्या रचनेनंतर प्रभाग मोठे झाल्यामुळे जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आता रात्रीचा दिवस करू लागले आहेत. विविध प्रकारचे परवाने काढण्यासाठी उमेदवारांनी खास कार्यकर्त्यांकडे जबाबदारी दिली आहे. सर्वच प्रभागात बहुरंगी लढती होत आहेत. त्यामुळे प्रचाराला कार्यकर्ते मिळणे उमेदवारांना अवघड होत आहे.

तीनही शहरात प्रचारफेर्‍यांची संख्या आता वाढू लागली आहे. प्रभाग मोठे असल्याने उमेदवार आणि समर्थकांना दिवसभर फिरावे लागते आहे.गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्याशिवाय आज  (रविवारी) सुटीचा दिवस असल्याने  सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी बाहेर पडले होते. विविध पक्षांच्या पदयात्रा, जाहीर प्रचार यामुळे प्रभागातील वातावरण ढवळून निघाले. चौका-चौकांत प्रचार करणार्‍या रिक्षामुळे गोंगाटाचे वातावरण होते.

प्रचारात विकासाचे मुद्दे झाले गायब

नागरिकांच्यादृष्टीने आरोग्य, पाणी, रस्ते, उद्यान, क्रीडांगण आदी सुविधा महत्त्वाच्या आहेत. बहुसंख्य प्रभागात या समस्या वर्षानुवर्षे कायम आहेत. काही ठिकाणी कामे झाली आहेत, मात्र, त्यातील अनेक  कामे निकृष्ट आहेत, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना नागरिकांच्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागते आहे.