Fri, Jul 10, 2020 18:31होमपेज › Sangli › ठाणे अमलदाराला लाच घेताना पकडले

ठाणे अमलदाराला लाच घेताना पकडले

Published On: Jul 24 2019 1:40AM | Last Updated: Jul 24 2019 12:15AM
मिरज : प्रतिनिधी
शहर पोलिस ठाण्यात ठाणे अमलदार जालिंदर पांडुरंग माने (वय 40, रा. शाहूनगर, इस्लामपूर) यास एक हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री ही कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे शहर पोलिस ठाण्यात खळबळ उडाली आहे. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी  एकास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी ठाणे अमलदार सेवेत असणार्‍या माने यांनी ‘दोन हजार रुपये दे, तुझ्यावर गुन्हा दाखल करीत नाही’, असे म्हणून पैशाची मागणी केली. त्या मागणीला तक्रारदाराने होकार दिला. ‘दोन हजार नाही, आता एक हजार देतो,’ असे माने यांना सांगितले.

यावेळी तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून शहर पोलिस ठाण्यातील ठाणे अमलदाराने गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील पथक तत्काळ शहर पोलिस ठाणे आवारात दाखल झाले.

  पथकाला ठाणे अमलदार ओळखण्याची शक्यता होती. त्यामुळे पथक ठाण्याबाहेर थांबले. नवोदित पोलिस निरीक्षक यांना ठाण्यात पाठविण्यात आले.  यावेळी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची रक्कम स्विकारत असताना ठाणे अंमलदार माने यांना रंगेहात पकडण्यात आले.

 उपअधीक्षक  साळुंखे, पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, जितेंद्र काळे, संजय कलकुटगी, अविनाश सागर, भास्कर भोरे, संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ, स्वाती माने, अश्विनी कुकडे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत शहर पोलिस ठाण्यात माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.