इस्लामपूर : वार्ताहर
भरधाव दूध टँकरने दुचाकीला धडक दिल्याने कुरळप पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय मारुती सुतार (वय 51, रा. सांगली, सध्या-इस्लामपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावर घडला. सुतार हे ड्युटीसाठी कुरळपला चालले होते. सुतार इस्लामपूरहून मोटारसायकलने कुरळपला चालले होते. वाघवाडी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून
भरधाव वेगात आलेल्या चिकुर्डे येथील शिवपार्वती रोडलाईनच्या दूध टँकर (एम.एच.-10 बीआर-6500)ने त्यांना धडक दिली. सुतार हे मोटारसायकलसह टँकरच्या पाठीमागील चाकाखाली सापडले. टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलचाही चक्काचूर झाला .
अपघातानंतर टँकर चालकाने टँकर तेथेच सोडून घटनास्थळावरून पलायन केले. सुतार महिन्यापूर्वीच ते मुलाच्या शिक्षणासाठी इस्लामपूर येथे राहण्यास आले होते. सकाळी ते इस्लामपूर उपविभागीय कार्यालयातून पोलिस ठाण्याचे टपाल घेऊन कुरळप पोलिस ठाण्याकडे चालले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
इस्लामपूर पोलिस ठाण्यात टँकर चालक शरद शिवाजी चिखले (रा. चिकुर्डे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची फिर्याद बाजीराव भोसले यांनी इस्लामपूर पोलिसांत दिली आहे.