Mon, Sep 16, 2019 11:49होमपेज › Sangli › धनादेश न वटल्याने कोल्हापूरच्या एकास कारावास 

धनादेश न वटल्याने कोल्हापूरच्या एकास कारावास 

Published On: May 08 2019 1:58AM | Last Updated: May 07 2019 11:26PM
इस्लामपूर ः प्रतिनिधी

राजारामबापू पाटील दूध संघास पशुखाद्य विक्रीपोटी दिलेला धनादेश न वटल्याने कोल्हापूरचे मनजित मगर यांना दोषी ठरवून 2 वर्षे कारावासाची शिक्षा व  16 लाख 12 हजार 666 रुपये इतक्या रक्कमेचा दंड अशी शिक्षा न्यायाधीश डी.व्ही. दिवाकर यांनी सुनावली. 

राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्यावतीने दिलेली  माहिती अशी, मगर हे कृष्णा पशुखाद्याचे अधिकृत विक्रेते  होते. त्यांनी दिलेला धनादेश न वटल्याने  संघाची पशुखाद्याची मोठे येणे बाकी तशीच होती. संघास  त्यांनी दिलेला आयडीबीआय बँक कोल्हापूर शाखेचा धनादेश न वटल्याने संघाने त्यांचे विरोधात इस्लामपूर न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता.

खटल्याचा निकाल संघाच्या बाजूने लागला असून  मनजित मगर यांना चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 नुसार फसवणुकीचा गंभीर गुन्हा केल्याने दोषी ठरवून 2 वर्षे कारावासाची शिक्षा व धनादेश रक्कमेच्या दुप्पट म्हणजे रुपये 16 लाख 12 हजार 666 रुपये इतक्या रक्कमेचा दंड अशी शिक्षा सुनावली. मगर याने दंडाची रक्कम व्याजासह दोन महिन्याच्या आत भरावयाची आहे. या निकालामुळे सहकारी संस्थेची येणेबाकी बुडविणार्‍यांना मोठा चाप बसणार आहे. 

राजारामबापू दूध संघाच्यावतीने अ‍ॅड. ए.डी. माळी यांनी काम पाहिले. या खटल्यामध्ये संघाच्यावतीने माजी लेबर ऑफिसर ए.बी. सूर्यवंशी, माजी कॅटल फीड मॅनेजर जे.बी. कुलकर्णी तसेच दिलीप मोहिते, किरण घोडके, ए.आर. पाटील, जे.एम. पाटील, प्रकाश काळे इत्यादींच्या महत्त्वपूर्ण साक्षी नोंदविण्यात आल्या.