Sat, Jul 04, 2020 11:27होमपेज › Sangli › ‘पंढरीची वारी रेल्वे’ यंदा नाही धावणार

‘पंढरीची वारी रेल्वे’ यंदा नाही धावणार

Last Updated: Jun 29 2020 10:55PM
मिरज : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात रेल्वेसेवा ठप्प आहे. त्यामुळे मिरज रेल्वे स्थानकही ओस पडले आहे. दरवर्षी दिमाखात धावणारी मिरज - पंढरपूर वारी विशेष रेल्वे यंदा धावणार नाही. 

पंढरपूर येथील आषाढी, कार्तिकी आणि माघी वारीला दरवर्षी मध्य रेल्वेकडून मिरेतून चार दिवस आधी व नंतर विशेष रेल्वेगाडी चालविली जात असे. या गाडीमुळे वारकर्‍यांना कमी खर्चात पंढरपूरला पोहोचण्यासाठी हक्काची रेल्वेगाडी होती. मात्र कोरोनामुळे यंदा ही रेल्वे धावणार नाही.  आषाढी वारी यावर्षी रद्द करण्यात आल्यामुळे सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणार्‍या पायी दिंड्याही निघालेल्या नाहीत.

कोरोनामुळे रेल्वेने दि. 22 मार्चपासून रेल्वेसेवा बंद  केली आहे. तथापि दि. 1 जूनपासून वास्को निजामुद्दीन - गोवा एक्स्प्रेस आणि यशवंतपूर - निजामुद्दीन द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. याशिवाय दिवसभरात 75 ते 80 गाड्यांच्या होणार्‍या फेर्‍या बंद आहेत. यामुळे रेल्वे स्थानकात शुकशुकाट आहे. 

ब्रिटीश काळापासून मिरज - लातूर रोड ही नॅरोेगेज रेल्वे सुरू करण्यात आली होती. या नॅरो गेज रेल्वेचे आता ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले आहे. नॅरोगेज रेल्वेकाळात वारकरी टपावर बसून प्रवास करण्याचाही आनंद घेत होते. रेल्वे बंद असल्यामुळे वारी कालावधीत वारकर्‍यांच्या विठ्ठल नामाच्या घोषणा आणि टाळमृदुंगाचा आवाज यंदा स्थानकात मात्र घुमला नाही.