Tue, Jul 14, 2020 02:55होमपेज › Sangli › पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसपुढे जागा राखण्याचेच मोठे आव्हान

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसपुढे जागा राखण्याचेच मोठे आव्हान

Published On: May 26 2019 1:46AM | Last Updated: May 25 2019 10:13PM
कडेगाव : रजाअली पिरजादे

सांगली लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील निवडून आले. या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघावर होणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा हुकमी मानला जात असलेल्या कडेगाव - पलूस विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव आणि जागा टिकवण्याचेच मोठे आव्हान आहे. 

2014 मध्ये संजय पाटील यांना कडेगाव - पलूस मतदारसंघात 27 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी मात्र  या मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी स्वाभिमानीचे विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. 

2014 मध्ये दुरंगी लढत झाली होती. परंतु यावेळी गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे  भाजप आणि काँग्रेसपुढे आव्हान उभे केले होते. त्यांनाही त्या मानाने चांगली मते मिळाली. साहजिकच विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीही जिल्ह्यात ताकद अजमावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कडेगाव-पलूस मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असण्याची शक्यता आहे.  त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही. 

हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. (स्व.) डॉ. पतंगराव कदम यांनी 30 वर्षे या मतदारसंघात एकहाती सत्ता राखली. या मतदारसंघात नेहमीच कदम विरुद्ध देशमुख, असा राजकीय संघर्ष पहावयास मिळला. पक्षीयदृष्ट्या काँग्रेसविरुद्ध भाजप असा संघर्ष रंगणार असला तरी कदम विरुद्ध देशमुख गट अशीच लढत होणार आहे. काँग्रेसकडून आमदार डॉ. विश्वजित कदम आणि भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. डॉ. विश्वजित कदम यांनी विकासकामे व आढावा बैठका घेऊन जोर लावला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामांचा सपाटा लावला आहे. 

यापूर्वी झालेली या  मतदार संघातील निवडणूक व होणारी निवडणूक यामध्ये खूप अंतर राहणार आहे. कारण डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक होणार आहे. सांगलीत पुन्हा एकदा संजय पाटील यांनी यश मिळवले आहे.  पृथ्वीराज देशमुख यांची भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून कामगिरी चांगली झाली आहे. संग्रामसिंह देशमुख यांनीही मतदारसंघात योग्य पद्धतीने काम केले आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात देशमुख घराण्याने विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या दोन वर्षापासूनच तयारी केली आहे. जि.प.चे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला आहे. त्यांनी विकास कामावरही मोठा भर दिला आहे. कोट्यवधींचा निधी मतदारसंघात आणला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आमदार विश्‍वजित कदम व संग्राम देशमुख हे दोघेही जोर वाढवणार आहेत.

डॉ. विश्वजित कदम यांच्यावर मोठी जबाबदारी

महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. सांगलीत भाजपचे  संजय पाटील पुन्हा निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यात आणि जिल्ह्यात भाजपचेच वर्चस्व राहणार आहे. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात केवळ कडेगाव व पलूस मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. ही जागा टिकवण्याबरोबर जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात काँग्रेसला यश मिळवून देणे आणि पर्यायाने राज्यातील काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणे, अशी मोठी जबाबदारी आ. विश्वजित कदम यांच्यावर राहणार आहे.