Thu, Jul 02, 2020 11:20होमपेज › Sangli › इस्लामपूर : उमेदवारीसाठीच विरोधी गोटात संघर्ष तीव्र

इस्लामपूर : उमेदवारीसाठीच विरोधी गोटात संघर्ष तीव्र

Published On: Sep 19 2019 1:31AM | Last Updated: Sep 18 2019 8:37PM
अशोक शिंदे

इस्लामपूर मतदारसंघात सलग 6 निवडणुका जिंकलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात सार्‍या विरोधकांचा ‘सर्वमान्य’ उमेदवार अजून ठरत नाही, अशी स्थिती आहे. निवडणुकीपूर्वीच सर्व विरोधकांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. विकास आघाडीची ‘एकीची मोट’ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे बांधणार का? आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी  सर्व विरोधकांचे सूत जुळणार का? हाच कळीचा मुद्दा आहे. 

वाळवा तालुक्यात 96 गावे असून, 3 लाख 50 हजार  मतदारसंख्या आहे. त्यापैकी शिराळा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेली गावे वगळता इस्लामपूर मतदारसंघात 49 गावे आहेत. मिरज तालुक्यातील 8 आहेत. अशा 57 गावांचे कार्यक्षेत्र आहे. इस्लामपूर व आष्टा या दोन नगरपालिकांचा मतदारसंघात समावेश आहे. 

1990 पासूनच्या सलग 6 निवडणुका सुमारे 40 ते 75 हजार मताधिक्याच्या फरकाने जयंत पाटील यांनी जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीचे संघटन, कार्यकर्त्यांचे नेटवर्क, मंत्री म्हणून  केेलेली विकासकामे, सततचा संपर्क आहे.

महापुराच्या आपत्ती काळात त्यांच्या पत्नी शैलजा, चिरंजीव प्रतीक व राजवर्धन यांच्यासह पक्षाच्या मंडळींनी पूरग्रस्तांना दिलेला आधार, राजारामबापू उद्योग समूहाचे पाठबळ अशा अनेक जमेच्या बाजू असलेले जयंत पाटील हे सातव्यांदा रिंगणात उतरत आहेत. 

अलीकडील काही निवडणुकांत त्यांच्याविरोधात मातब्बर आणि तुल्यबळ विरोधी उमेदवार रिंगणात नव्हता, असेही आजवर दिसून आले. इस्लामपूर पालिकेत राष्ट्रवादीच्या 31 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून भाजपचे निशिकांत पाटील नगराध्यक्ष झाले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह स्व. नानासाहेब महाडिक व भाजप, शिवसेना, काँग्रेस, रयत क्रांती अशा अनेकांची एकी ‘विकास आघाडी’च्या माध्यमातून त्यावेळी झाली होती. 

त्यानंतर अलीकडे मंत्री खोत व नगराध्यक्ष पाटील यांच्यातील अंतर वाढू लागले आणि आघाडीची बिघाडी होऊ लागली. विरोधकांकडून उमेदवारीसाठी मंत्री खोत यांच्याबरोबर गटनेते राहुल महाडिक, शिवसेनेचे आनंदराव पवार, भाजपचे विक्रम पाटील, वैभव शिंदे, हुतात्मा समूहातून गौरव नायकवडी तसेच भीमराव माने अशी काही नावे चर्चेत आली. या मंडळींनी निशिकांत पाटील यांना वगळून आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, असा सूर आळवला आहे. मंत्री खोत यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे, राष्ट्रवादीमधील गटा-तटाचे राजकारण, राहुल महाडिक,  नगराध्यक्ष पाटील, आनंदराव पवार आदींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी घेतलेला पुढाकार, वर्षानुवर्षे सत्तेच्या परिवर्तनाची अपेक्षा ठेवलेला विरोधी गट अशा अनेक विरोधी गटाच्या जमेच्या बाजू आहेत. 

आजवरच्या निवडणुकांत आक्रमक विरोधक म्हणून राहिलेल्या स्व. नानासाहेब महाडिक यांच्या दोन्ही चिरंजीवांची भूमिकादेखील विरोधी उमेदवारीच्या द‍ृष्टीने परिणामकारक ठरणारी आहे. इकडे हा मतदारसंघच तूर्तास शिवसेनेकडे असल्याने त्याचेही पडसाद विरोधी उमेदवारी ठरवताना उमटणार आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सर्व्हे’नुसार भाजपची उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार नगराध्यक्ष पाटील यांचे नाव पुढे दिसते आहे. जर त्यांना उमेदवारी जाहीर झालीच, तर विरोधकांमधील अनेक मंडळी भाजपबरोबर राहणार का, हा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. अर्थात, विरोधकांमधील दुफळीचा लाभ जयंतरावांना झाला, तर त्यात आश्‍चर्य वाटण्याजोगे काही असणार नाही.