होमपेज › Sangli › विरोधकांकडून केवळ दिशाभूल : संजय पाटील

विरोधकांकडून केवळ दिशाभूल : संजय पाटील

Published On: Apr 10 2019 2:05AM | Last Updated: Apr 09 2019 9:18PM
आटपाडी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या अनेक भानगडी बंद केल्या.देशाच्या सुरक्षेला महत्व दिले.विकासाचे नवे पर्व सुरू केले. त्यामुळे भाजपला साथ द्या. अन्य उमेदवार येतील, विरोेधक दिशाभूल करतील पण तुम्ही दूध कोणते आणि पाणी कोणते, ते ओळखा आणि भाजपला साथ द्या, असे आवाहन सांगली मतदारसंघातील  महायुतीचे उमदेवार खासदार संजय पाटील यांनी केले.  

आटपाडी येथे प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी पाटील बोलत होते.  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, दीपक शिंदे, सभापती हर्षवर्धन देशमुख, अरुण बालटे, रुपेशकुमार पाटील, तासगावचे नगराध्यक्ष डॉ.विजय सावंत, ऋषीकेश देशमुख, आप्पासाहेब काळेबाग, अनिल पाटील, अजित चव्हाण, विनायक मासाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमरसिंह देशमुख म्हणाले, कृष्णेचे पाणी देण्याची अनेक वर्षांची मागणी युतीच्या काळात टेंभूच्या माध्यमातून मार्गी लागली. भाजपच्या सहकार्याने खासदार पाटील यांनी त्याला गती दिली. आता हा दुष्काळ शेवटचा दुष्काळ ठरावा याकरिता आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी  संजय पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. देशमुख म्हणाले, 40 वर्षे काँग्रेसच्या पाठीशी राहून पाणी प्रश्न सुटला नाही. 1995 ला धाडस केले आणि  टेंभू मार्गी लागली. ती  काँग्रेस आघाडीने 15 वर्षे रखडवत ठेवली.  2014  नंतर  संजय पाटील यांच्या  प्रयत्नातून योजना पुन्हा मार्गी लागली. ते म्हणाले, आटपाडी तालुक्यासह जिल्ह्याच्या  विकासाला चालना देण्यासाठी कोण उमेदवार काय म्हणतो याकडे लक्ष न देता भाजपला साथ द्या. खासदार पाटील म्हणाले, दुष्काळी भागाला पाणी देण्याचे स्वप्न भाजपच्या राज्यातच पूर्णत्वास जात आहे. राष्ट्रीय महामार्ग, ड्रायपोर्ट, रेल्वे मार्ग आदिंसाठी केंद्रा तून निधी आणून विकासाला गती दिली.

यावेळी कार्यकर्त्यांनी संजय पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचा निर्धार केला. हर्षवर्धन देशमुख यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले,  संजय पाटील यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील  अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.  प्रदीप देशपांडे यांनी आभार मानले.  खासदार पाटील यांच्या प्रचारार्थ शेटफळे, तडवळे, यपावाडी, कौठुळी येथे सभा- बैठका झाल्या. आटपाडी येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. बहुजन वंचित आघाडीचे विनायक मासाळ यांनी शेटफळे येथे भाजपमध्ये प्रवेश केला.