सांगली : प्रतिनिधी
शासकीय अधिकार्यांनी आपल्याला अनुकूल असा अहवाल तयार करण्यासाठी शासकीय अधिकार्यांना एक लाख ९८ हजार रुपयांची लाच देताना एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. अजित उध्दव सूर्यवंशी(वय 41, रा. पलूस) असे संशयिताचे नाव आहे. पारे(ता. खानापूर) येथील ‘राजवर्धन पाटील मुलांचे बालगृह’ या संस्थेचे तो अध्यक्ष आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पारे येथील रेकॉर्डवर ८८ मुले असल्याची नोंद आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी सुवर्णा पवार यांनी त्या ठिकाणी भेट दिली असता त्यावेळी सातच मुले आढळून आली. ही वस्तुस्थिती असताना सूर्यवंशी याने खोटी माहिती देऊन शासनाचे अनुदान लाटले. त्याशिवाय या वर्षीच्या अनुदान मागणीसाठी खोटी कागदपत्रे देऊन ८८ मुले हजर असल्याची माहिती दिल्याचे श्रीमती पवार यांच्या तपासणीत निष्पन्न झाले.
श्रीमती पवार यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. तो वरिष्ठ कार्यालयास सादर होणार असल्याची माहिती सूर्यवंशी याला मिळाली होती. त्यानंतर आपल्या संस्थेचा नकारात्मक अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवू नये, यासाठी लाच देण्याचे आमिष आणि प्रलोभन श्रीमती पवार यांना तो दाखवू लागला.
दरम्यान, याबाबतची तक्रार श्रीमती पवार यांनी लाचप्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांना भेटून लेखी स्वरुपात दिली. विभागाने या तक्रारीची शहानिशा केली होती. दरम्यान सूर्यवंशी सातत्याने दूरध्वनीवरून संपर्क साधून पवार यांना भेट देण्याची विनंती करीत होता. त्यानुसार पवार यांनी पुणे येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी त्याला बोलावले. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. त्यावेळी फक्त सूर्यवंशी याने फक्त चर्चा केली.
त्यावेळी ही लाच पुणे येथे दि. 11 डिसेंबर रोजी देण्याचे ठरले होते. मात्र, त्या दिवशीही सूर्यवंशी याने ही रक्कम ठरल्या प्रमाणे दिली नाही. नंतर सूर्यवंशी याने पवार यांना सांगली येथील कार्यालयात आज पैसे देण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा लावला. सूर्यवंशी 1 लाख 98 हजार रुपये देत असताना त्याला रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दिवाण, अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार गायकवाड, पोलिस उपाध्यक्ष गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूरचे पोलिस निरीक्षक मारूती पाटील, शाम बुचडे, नवनाथ कदम आदिंनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.