Mon, Jul 06, 2020 16:54होमपेज › Sangli › शिरगावमध्ये बेकायदा पिस्तुलासह एकाला अटक

शिरगावमध्ये बेकायदा पिस्तुलासह एकाला अटक

Published On: Apr 15 2019 1:59AM | Last Updated: Apr 15 2019 12:14AM
तासगाव : शहर प्रतिनिधी

तालुक्यातील शिरगाव गावच्या हद्दीत बेकायदा बिगरपरवाना शस्त्र  विक्रीसाठी आलेल्या खानापूर तालुक्यातील एकास तासगाव पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 70 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.सुनील अनिल पवार (वय 21, रा. लेंगरे, ता. खानापूर) असे त्याचे नाव असून तो एक अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांनी दिली. यावेळी पोलिस निरीक्षक अजय सिंदकर उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणूक काळात पिस्तूल सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.बनकर म्हणाले, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराडे यांनी सांगली जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व गुन्हेगारी टोळ्या तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध शस्त्रे विक्री करणार्‍या टोळ्या, अवैध पिस्तुलचा वापर करणारे गुन्हेगार यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी बनकर व पोलीस निरीक्षक सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रे विक्री करणार्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान रविवारी पोलीस शिपाई सोमनाथ गुंडे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की सुनिल पवार हा तालुक्यातील शिरगाव येथे बेकायदा पिस्तुल विक्री करण्यासाठी येत आहे. 

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके, पोलीस नाईक रमेश चव्हाण सचिन घाटके, विलास मोहिते, सतिश खोत, सोमनाथ गुंडे, विनोद सकट, महादेव हसबे या पोलीस पथकाने  धाव घेवून शिरगाव परिसरात सापळा लावला. दुपारी बाराच्या दरम्यान बातमीदाराने दिलेल्या माहिती प्रमाणे एकजण विट्याकडून पायी चालत येऊन शिरगांव येथील एस.टी.पिकअप शेडच्या बाजूस उभा राहून कोणाची तरी वाट पाहु लागला.वेळोवळी तो त्याच्या कमरेला चाचपून पाहत होता. पोलिसांनी साडेबारा वाजता ताब्यात घेतले, यावेळी त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.