होमपेज › Sangli › मनपा क्षेत्रातील अंगणवाड्या वार्‍यावर

मनपा क्षेत्रातील अंगणवाड्या वार्‍यावर

Published On: Aug 25 2019 1:22AM | Last Updated: Aug 25 2019 1:22AM

file photoमिरज : जालिंदर हुलवान

राज्य शासन व केंद्र शासनाच्या दृष्टीने अंगणवाडी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प समजला जातो. मात्र महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणार्‍या अंगणवाड्यांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. या अंगणवाड्या चालविणार्‍या सर्व सेविका व मदतनीस यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. बहुसंख्य अंगणवाड्या भाड्याच्या जागेत आहेत. त्यांचे गेल्या पाच महिन्यांपासून भाडेही दिलेले  
नाही. 

महापुरामध्ये नुकसान झालेल्या सांगली व मिरजेतील वीस अंगणवाड्यांना अद्याप मदत देण्यात आलेली नाही. या अंगणवाड्यांना वार्‍यावर सोडले आहे.
शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात अंगणवाड्या चालविल्या जातात. सांगली जिल्ह्यातही अनेक अंगणवाड्या आहेत. सांगली -मिरज-कुपवाड महानगरपालिका हद्दीमध्ये 156 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी 50 मिरजेत आणि 106 ह्या सांगली व कुपवाड येथे आहेत. या अंगणवाड्यांचे कामकाज हे प्रकल्प अधिकारी चालवितात. मात्र, 2013 पासून येथे पूर्णवेळ प्रकल्प अधिकारी नाहीत. अन्य अधिकार्‍यांना अतिरिक्त पदभार दिला जातो. आजही एका अधिकार्‍याला या पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. 156 पैकी 151 अंगणवाड्या भाड्याच्या जागेत आहेत. 
घरमालकांना दरमहा साडे सातशे रुपये भाडे दिले जाते. त्या सर्व अंगणवाड्यांचे  पाच महिन्यांपासून भाडे मिळालेले नाही. त्यामुळे घरमालक त्या अंगणवाड्या बंद करण्याच्या तयारीत आहेत. 
या अंगणवाड्यांतील सेविकांना 6500 व मदतनीसांना 3500 रुपये मासिक मानधन दिले जाते. ते मानधनही  दोन महिन्यांपासून दिलेले नाही. त्यामुळे त्यांचे  हाल होत आहेत. 

वास्तविक त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2013 पासून ती लागू करण्यात आली आहे.  ती देखील दिलेली नाही. महापुरामध्ये सांगली मिरजेतील 20 अंगणवाड्या बुडाल्या होत्या. अंगणवाड्यातील रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक  वजनकाटे, भांडी, सतरंजा अशा वस्तू खराब झाल्या आहेत. शासनाकडून सध्या सानुग्रह अनुदान दिले जात आहे. मदतही सुरू आहे. मात्र ती मदत घरमालक घेत आहेत. अंगणवाडी भाड्याने असल्याने त्यांना कोणतीही मदत मिळालेली नसल्याचे चित्र समोर आले आहे.

पंचनामे करून प्रस्ताव पाठविला

प्रकल्प अधिकारी व जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी सुवर्णा पवार म्हणाल्या, आम्ही महापुराने नुकसान झालेल्या अंगणवाड्यांचे पंचनामे करून महापालिका आयुक्तांकडे मदतीची मागणी केली आहे. मात्र अद्याप मदत मिळाली नाही. अंगणवाड्यांच्या पुनर्वसनासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.