Wed, Jun 19, 2019 08:09होमपेज › Sangli › वृध्दाला चाकूचा धाक दाखवून लुबाडल्याप्रकरणी तिघांना अटक

वृध्दाला चाकूचा धाक दाखवून लुबाडल्याप्रकरणी तिघांना अटक

Published On: Oct 12 2018 1:02AM | Last Updated: Oct 12 2018 1:02AMकुपवाड : वार्ताहर 

येथील एमआयडीसीतील मिरज रस्त्यालगत असलेल्या बसस्थानकाजवळ मंगळवारी रात्री बाळकृष्ण देवाप्पा पाटील (वय 66, रा. रोटरीनगर, सावळी) या यांना चार अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण करून लुबाडले होते.याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी चोवीस तासाच्या आत तीन संशयिताना अटक करून मुद्देमाल जप्त केला.  या प्रकरणातील एका अल्पवयीन गुन्हेगारास ताब्यात घेतले. 

अटक केलेल्या संशयितामध्ये गणेश भगवान आवळे (वय 26,रा.कवठेपिरान), अशोक महंमद नदाफ (वय 25, सांगली), तुषार राजेंद्र बेले (वय 19,   समडोळी, ता. मिरज) या तिघांचा समावेश असून या प्रकरणातील एका अल्पवयीन गुन्हेगारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बाळकृष्ण पाटील मिरजेतून बसने कुपवाड एमआयडीसीत आले. तिथे उतरून ते सावळीतील घरी पायी चालले होते. पाठीमागून मोटारसायकलीवरून (एम.एच.10, ए.डी.-9216) संशयित गणेश आवळे, अशोक नदाफ, तुषार बेले व एक अल्पवयीन असे चौघेजण आले. त्यांनी पाटील यांना धारदार चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. मोबाईल व रक्कम काढून घेतली व मोटारसायकलवरून धूम ठोकली. 

या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाल्यावर सहायक निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार कृष्णा गोंजारी, नितीन मोरे, विश्‍वास वाघ यांना  गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस शोध घेत असताना बुधवारी रात्री कवलापूर हद्दीजवळ तीनजण मोटारसायकलवरून वेगाने जाताना दिसले. पोलिसांनी  त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी कुपवाड एमआयडीसीतील वृध्दाला मारहाण करून लुबाडल्याची कबुली दिली.