Sat, Sep 21, 2019 06:34होमपेज › Sangli › राजकीय बॅनर न हटवल्याने चार ग्रामसेवकांना नोटीस

राजकीय बॅनर न हटवल्याने चार ग्रामसेवकांना नोटीस

Published On: Mar 12 2019 1:50AM | Last Updated: Mar 12 2019 1:50AM
सांगली : प्रतिनिधी

ग्रामपंचायत हद्दीतील राजकीय बॅनर, पोस्टर्स हटवण्यात ढिलाई केल्याने वाळवा, पडवळवाडी, अंकलखोप, भिलवडी येथील चार ग्रामसेवकांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा परिषदेत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

लोकसभा निवडणूक आचारसंहिता रविवारपासून लागू झाली आहे. जिल्हा परिषदेने कालच सर्व खातेप्रमुख तसेच ग्रामपंचायतींना सूचना देऊन राजकीय बॅनर्स, पोस्टर्स हटविण्याच्या तसेच कोनशिला, नामफलक झाकण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सोमवारी काही गावांना भेटीवेळी राजकीय पोस्टर्स, बॅनर्स दिसून आल्याने संबंधित ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली. राजकीय पक्षांचा मतदारांवर प्रभाव पडेल असे नवीन प्रकल्प किंवा कार्यक्रम, सवलती घोषित करणे अथवा त्याची आश्‍वासने देणे किंवा त्याची कोनशिला बसवणे या बाबी आचारसंहिता कालावधीत करता येणार नाहीत. 

ज्या योजना अगोदरच पूर्णत्वाच्या टप्प्यावर आल्या आहेत, अशा योजना लोकहितार्थ थांबवू नये, असे सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकार्‍यांना कळविले आहे. शासकीय कार्यालयाच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, कटआऊट, होर्डिंग्ज, बॅनर्स, झेंडे तसेच बसस्टँड, रस्ते, शासकीय बसेस, इलेक्ट्रीक, विद्युत खांब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतीतील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणुका जाहीर झाल्यापासन 48 तासांच्या आत आणि खासगी संपत्तीवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणुका जाहीर झाल्यापासून 72 तासांच्या आत काढून टाकण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.