Fri, Jul 10, 2020 15:54होमपेज › Sangli › पर्यायी उपचार नव्हेत; रुग्णांच्या जीवांशी खेळ

पर्यायी उपचार नव्हेत; रुग्णांच्या जीवांशी खेळ

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 21 2018 9:18PMसांगली : गणेश कांबळे

पर्यायी आणि पारंपरिक उपचार पद्धतीच्या नावाखाली अनेकजण आजार बरे करण्याचे दावे करून राजरोस उपचार करीत आहेत. यामध्ये अ‍ॅक्युप्रेशर, अ‍ॅक्युपंक्‍चर, रेकी, हिप्नॉटिझम, मसाजपासून निसर्गोपचार तसेच शिवांबू प्राशनापर्यंत अनेक थेरपींचा समावेश आहे. या थेरपीसंदर्भात अनेक ठिकाणी तक्रारीही होत आहेत. काही पॅथींना शासनाची मान्यता नसतानाही बिनधिक्कतपणे उपचार केले जातात. त्यामुळे एकप्रकारे रुग्णांच्या जीवांशी खेळण्याचाच प्रकार आहे. वास्तविक पाहता पर्यायी उपचार पद्धती खर्‍या किती अन् खोट्या किती, याचे स्पष्टीकरण  होणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. मिरजेत अ‍ॅक्युपंक्‍चरचे शिबिर भरवून, नाडी तपासणीद्वारे विविध आजारावर उपचार करणार्‍या पुण्यातील एका दाम्पत्याला महापालिकेच्या पथकाने पकडले. पुण्यामध्ये तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका डॉक्टरच्या उपस्थितीमध्येच रुग्णावर बुवाबाजीचे उपचार करण्यात आले. त्यात महिला रुग्णाचा मृत्यू झाला. 

अनेकजण हिप्नॉटिझमद्वारे बुद्धी, स्मरणशक्‍ती वाढविण्याचा दावा करून लाखो रुपये उकळत असतात. काहीजण रेकी थेरपी (हस्तस्पर्श) देऊन रोग बरे करतात.  अ‍ॅक्युप्रेशर (शरीराच्या ठराविक पाँईटवर दाब देऊन), अ‍ॅक्युपंक्‍चर (शरीराच्या पाँईटवर सुईने टोचून) थेरपी देऊन उपचार केले जातात. त्यामुळे रुग्ण बरे होतात का, असा प्रश्‍न निर्माण होतो. 

सांगलीतील मानसोपचारतज्ज्ञ व पर्यायी उपचार पध्दतीचे अभ्यासक डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, जगभर सर्वत्र अ‍ॅलोपॅथीला आधुनिक वैद्यक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे. आपल्याकडे या पॅथीला कायद्याने मान्यता आहे. तसेच भारतीय परंपरेत आयुर्वेदामध्ये योग, ध्यानधारणा आदिंच्या सहाय्याने उपचार केले जातात. त्याचबरोबर होमिओपॅथी, युनानी, अ‍ॅक्युपंक्‍चर, अ‍ॅक्युप्रेशर आदी विदेशी पद्धतीनेही उपचार केले जातात. 

यापैकी आयुर्वेद आणि होमिओपॅथीला आपल्याकडे कायद्याने मान्यता आहे. निसर्गोपचाराला पश्‍चिम बंगाल आणि महाराष्ट्रात कायद्याने मान्यता दिली आहे. परंतु अन्य पर्यायी पॅथीला कोणतीही मान्यता नाही.मेडिकल कौन्सिलची तसेच कायद्याची मान्यता नसतानाही काहीजण या पर्यायी उपचार पद्धतीचे केवळ कोर्स करून काही रोगावर उपचार करतात. त्यानंतर रोग बरे झाल्याचे दावे करीत असतात. आधुनिक पद्धतीत अजून उपचार सापडले नाहीत, अशा रोगांवर सुद्धा उपचाराचे दावे या पर्यायी उपचार पद्धतीमध्ये केले जातात. 

‘स्व’ रोगप्रतिकार  शक्तीचा फायदा 

पर्यायी उपचार पध्दतीमध्ये काही वेळेस रोगी बरे झाल्याचे दिसून येते. वास्तविक  व्यक्तिची ‘स्व’ रोगप्रतिकार शक्‍ती कमी झाली की दमा, मधुमेहासारखे आजार उद्भवत असतात. त्या दरम्यान व्यक्‍ती जर अशा पर्यायी पद्धतीचा उपचार घेत असेल आणि त्याचवेळी तिच्या  रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ झाली तर तो आजार बरा होतो. परंतु त्याचे क्रेडिट मात्र पर्यायी उपचार पद्धतीला जाते. 
आजार होणे आणि बरे होणे यासाठी व्यक्तिची मानसिकताही काही प्रमाणात कारणीभूत ठरत असते. त्वचारोग, दमा, मधुमेह इत्यादी.

Tags : Sangli, Sangli News, Not an alternative treatment, Games with patients life