Mon, Jul 06, 2020 17:53होमपेज › Sangli › विकासाचा पत्ता नाही, भांडणेच अधिक

विकासाचा पत्ता नाही, भांडणेच अधिक

Published On: Apr 08 2018 2:16AM | Last Updated: Apr 07 2018 8:07PMतासगाव : प्रमोद चव्हाण

तासगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांत सातत्याने राजकीय वादावादी आणि त्यातून दोन गट एकमेकांना भिडण्याच्या घटना घडत आहेत. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवेळी राष्ट्रवादी -भाजप कार्यकर्त्यांत धुमश्‍चक्री झाली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात नगरपालिका प्रभाग क्रमांक  6 च्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान  पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये राडा झाला.  पोलिसांवरही हल्‍ला करण्यात आला. विकासाच्या कामाऐवजी वादावादी आणि हाणामारी अशा घटनांमुळे  तालुक्याचे नाव सातत्याने गाजत आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भाजपचे नेते खासदार संजय पाटील करीत आहेत. तासगाव नगरपालिकेत दीड वर्षांपूर्वी भाजपने सत्ता मिळवली. जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत आहे. राज्यात आणि केंद्रातदेखील याच पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे तासगाव शहर आणि तालुक्यात विकासाला मोठी चालना मिळेल, अशी जनतेची रास्त अपेक्षा होती. तालुक्यात आजही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. द्राक्षबागा कशा जगवायच्या असा शेतकर्‍यांसमोर सतत प्रश्न असतो. प्रादेशिक योजनांच्या सततच्या सुरू - बंद अवस्थेमुळे पिण्याच्या पाण्याची समस्याही असते. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. तालुक्यात गेल्या चार वर्षांत कोणताही छोटा-मोठा नाव घेण्यासारखा उद्योग सुरू झालेला नाही. 

(स्व.) आर. आर. पाटील यांनी तालुक्यातील आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणी योजनांना गती दिली. त्या तितक्याच सक्षमपणे चालवल्या देखील. दोन्ही तालुक्यांत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. द्राक्षबागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनदरबारी सातत्याने प्रयत्न केले.  मात्र त्यांच्या पश्चात पाणी योजनांची स्थिती कठीण आहे. भाजपची सत्ता आल्यापासून शहरात आणि तालुक्यात  विकासाची कोणती भरीव कामे झाली, असा सवाल जनतेतून विचारला जातो आहे. प्रत्येक निवडणूक वादावादी, हाणामारी यामुळे गाजत आहे. 

तालुक्यात  अनेक  सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. तालुक्यात एकही औद्योगिक वसाहत नाही. कंपन्या आलेल्या नाहीत. तालुक्याच्या विकासाचे एकेकाळी केंद्र असलेला साखर कारखानाही बंद अवस्थेत आहे. तो केव्हा सुरू होईल ते सांगता येत नाही. केंद्र व राज्य शासनाच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या अनेक योजना आहेत. मात्र त्यांचा तालुक्यात नेमका किती जणांना व कोणता लाभ झाला, ते समजून येत नाही. उलट मारामारी, भांडणे यामुळे अनेक  तरुणांचे भवितव्य संकटात येत आहे. विकासकामांना गती देण्यासाठी आंदोलने होण्याऐवजी राजकीय कारणातून बंद, धरणे अशी आंदोलने होत आहेत. शहरात कचरा उठावसह अनेक समस्या आहेत. शहराचे सौंदर्य वाढवून  नागरी सुविधांची अधिकाअधिक उपलब्धता नागरिकांना करून देण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारकडून त्यासाठी नगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर निधी मिळू शकतो. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. शहराचा आणि तालुक्याचा विकास हे उद्दिष्ट ठेवून यापुढे काम केले तरच ते शक्य आहे. 

पालकांनो पाल्यावर लक्ष ठेवा :  बोराटे

अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे दै. ‘पुढारी’ शी बोलताना म्हणाले, तासगाव तालुक्यात अठरा ते पंचवीस वर्षांच्या तरुणांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. असे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या पालकांना आपल्या पाल्याने काय केले आहे, हे समजते. माझ्या मुलाला नेता ओळखतो, तो राजकारणात मोठी ओळख घेऊन फिरतो आहे, असे म्हणून पालक आपल्या पाल्याचे कौतुक करताना दिसतात. मात्र जेंव्हा एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळी हेच नेते सोडवण्यासाठी येत नसतात, हे वेळ गेल्यावर समजते. त्यामुळे पालकांनी पाल्यावर लक्ष ठेवले पाहिजे. त्यांना योग्य शिक्षण दिले पाहिजे. अन्यथा वेळ गेल्यावर पश्चाताप करावा लागेल.

Tags : Sangli, No, result,  Development, quarrels, more