होमपेज › Sangli › जिल्ह्यात वाळूमाफिया पुन्हा ‘मोकाट’

जिल्ह्यात वाळूमाफिया पुन्हा ‘मोकाट’

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 14 2018 8:37PMसांगली : मोहन यादव 

जिल्ह्यात वाळू तस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे.  जत, कडेगाव, तासगाव, खानापूर, आटपाडी या तालुक्यात बोर, येरळा, माणगंगा, अग्रणी नदीतून रात्री  चोरुन बेबंद उपसा केला जात आहे. पलूस, वाळवा तालुक्यात वाळू बंद झाल्याने माती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जिल्हा व तालुका प्रशासन याबाबत हातावर हात बांधून बसले आहे. यातून माफिया गब्बर होऊ लागले आहेत.

वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वाळूमाफियांचे कबंरडे मोडले. धाडसी कारवाई करुन त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकडो ब्रास वाळू जप्त केली. कित्येक वाहने ताब्यात घेतली. लाखो रुपयांचा दंड केला. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई होती. यामुळे वाळू चोरट्यांना कळायचे बंद झाले होते. अनेकांची पुरती घाबरगुंडी उडाली होती. कारवाईच्या भीतीने अनेकांनी तस्करी बंद केली. यामुळे जिल्ह्यातील वाळूचा दोन नंबरचा धंदा जवळपास पूर्णपणे थांबला. सहा-सात महिने कोणीही काहीही हालचाल केली नाही.पण मागील दोन-चार महिन्यांपासून तस्करांनी पुन्हा हळूहळू डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत  रात्री  वाळूची चोरटी वाहतूक सुरू झाली  आहे. यासाठी  महसूलची  ‘साथ’ घेतली  जात आहे. 

प्रामुख्याने जत तालुक्यात वाळू चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील बोर नदीपात्र खरडून काढण्याचे काम रात्रभर केले जात आहे. अचकनहळ्ळी, उमदी, मुचंडी, बालगाव, संख, सुसलाद, सोनलगी, हळ्ळी, बेळूडंगी, तिकोंडी यासह अन्य गावांत वाळू चोरी सुरू आहे. तसेच  कर्नाटकातील विजापूर, अथणी, चडचण व सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला येथून  उपसा केलेली वाळू सहजपणे जतमध्ये आणली जात आहे. याकडे महसूलचे साफ दुर्लक्ष आहे. दाखविण्यासाठी लुटूपुटूच्या कारवाया केल्या जात आहेत. पोलिस व महसूलमधील कर्मचार्‍यांचे हात यात गुंतले आहेत. आटपाडी तालुक्यातील बनपुरी, आटपाडी, निंबवडे हे तलाव तसेच बोंबेवाडी, खांजोडेवाडी, दिघंची येथील माणगंगा नदीपात्र ओरबडले जात आहे. कडेगाव तालुक्यात येरळा नदीकाठच्या  शेळकबाव, वांगी, नेवरी, हणमंतवडिये, भिकवडी, विठ्ठलनगर, कान्हरवाडी, येतगाव, रामापूर, देवराष्ट्रे शिवणी, वडियेरायबाग या  गावात वाळू माफियांनी पुन्हा धुमाकूळ  घातला आहे. 

तासगाव तालुक्यात तासगाव शहर, निमणी, राजापूर, चिखलगोठण,  ढवळी, तुरची या गावांत राजरोस वाळू उपसा सुरू आहे.  पलूस तालुक्यातील वसगडे, बह्मनाळ येथेही रात्रीच्या वेळी चोरी-छुपके चोरटी वाहतूक होत आहे. मिरज तालुक्यातील नांद्रे येथील येरळा नदीपात्रातून वाळू काढण्यासाठी महसूलकडून मोठी वसुली करुनच परवानगी दिली जात आहे. याबरोबरच खानापूर तालुक्यातील चिखलहोळ, हिंगणगादे, बलवडी यासह अन्य परिसरात येरळा नदीतून वाळू उपसा करणारे तस्कर मोकाट सुटले आहेत. चोरीसाठी खास पिकअप जीपची वाहने वापरली जात आहेत. विटा शहरात अशी जवळपास 100 पेक्षा अधिक वाहने आहेत. भंगार बाजारातील वाहने घेवून विना नंबर प्लेट वापरली जात आहेत. पकडली तरी ही वाहने आणण्यास कोणी जात नाही. तस्करांचे महसूल व पोलिसांशी लागेबांधे असल्याने कारवाई करण्यापूर्वी त्यांना टीप दिली जात आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात  तहसीलदारांनी कडक भूमिका घेतल्याने वाळू चोरी काही प्रमाणात थांबली आहे. तरीही किरकोळ प्रकार सुरू आहेत. 

वाळू चोरीचे आगार असलेल्या पलूस, वाळवा तालुक्यात सध्या तस्करी पूर्णपणे ठप्प आहेत. पण वाळू बंद  म्हणून माफिया मातीकडे वळले आहेत. डंपर, जेसीबीची यंत्रणा नदीकाठची माती खोदाईसाठी वापरली जात आहे. पलूस तालुक्यात अंकलखोप, बुर्ली, आमणापूर, संतगाव, भिलवडी, सुखवाडी, चोपडेवाडी,  पुणदी, नागराळे तर वाळवा तालुक्यातील हुबालवाडी, मसुचीवाडी, खरातवाडी, नरसिंगपूर, गौंडवाडी, बहे यासह अन्य नदीकाठच्या गावांत कृष्णेचे पात्र खरवडले जात आहे. वारणा भागात काही ठिकाणी  मुरुम, दगडे याची चोरीही  केली जात आहे. 

वाळूचा दर ट्रकला 

60 ते 80 हजार रुपयेचोरी बंद झाल्याने वाळू दर गगनाला भिडले आहेत. सहा महिन्यापूर्वी वाळूचा पाच ते सहा ब्रासचा डंपर 40 ते 50 हजार रुपयांना मिळत होता. आता यात आणखी वाढ झाली आहे. 60 हजारांपासून ते 80 हजार असा सरासरी दर वाढला आहे. यामुळे वाळू माफियांचे उखळ पांढरे झाले आहे. अनेकजण लखपती झाले आहेत. 

जिल्हाधिकारी रजेवर गेल्याने तस्करांचे फावले

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी वाळू तस्करांच्या पार मुसक्या आवळल्या होत्या, पण ते सध्या दीर्घ रजेवर गेले आहेत. यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. हळूहळू सुरू असलेला उपसा गेल्या 15 दिवसांपासून प्रचंड प्रमाणात सुरू आहे. यावर सध्याच्या अधिकार्‍यांनी कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.