Mon, Sep 16, 2019 06:19होमपेज › Sangli › आटपाडीत मरगळलेल्या राष्ट्रवादीला संजीवनी

आटपाडीत मरगळलेल्या राष्ट्रवादीला संजीवनी

Published On: Apr 07 2018 2:04AM | Last Updated: Apr 06 2018 11:45PMआटपाडी : प्रशांत भंडारे

दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हल्लाबोल यात्रेनिमित्त आटपाडीत झालेल्या सभेमुळे गेल्या वर्षभरात मरगळलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळाली आहे. काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीचाच बोलबाला असलेल्या आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत देशमुख बंधूंनी सोडचिठ्ठी दिल्याने आलेली मरगळ काही अंशी कमी झाली आहे.

हल्लाबोल सभेच्या निमित्ताने तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, रावसाहेब पाटील, सादिक खाटीक, सूरज पाटील, अमित ऐवळे व सहकार्‍यांनी जोरदार प्रयत्न केल्याने सभेला चांगली उपस्थिती होती. खानापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनीही खानापूर तालुक्यातून चांगली साथ दिल्याने हल्लाबोल सभा यशस्वी ठरली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडली आहे. तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी नेत्यांनी ताकद दिल्यास तालुका पुन्हा राष्ट्रवादीमय करण्याची ग्वाही दिली आहे. परंतु तालुका राष्ट्रवादीमय करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतील, हे मात्र निश्‍चित आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार्‍यांनी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व आमदार अनिल बाबर यांच्यावर टीका केली.परंतु यामधून त्यांचा अजूनही देशमुख बंधूना सॅाफ्टकॅार्नर असल्याचे जाणवत होते. निवडणुकांना वर्षभर अवधी असल्याने सावधपणे टीका झाल्याचे आणि परतीचे दोर अद्याप कापले गेले नाहीत हे अधोरेखित होत होते.

टेंभू योजनेचे रखडलेले काम, कर्जमाफी, तालुक्याची आणेवारी, रोजगार हमीची कामे, टँकरची मागणी, पाणी टंचाई शेतमालाला हमीभाव व अन्य जुने विषय पुन्हा एकदा सभेमुळे नव्याने समोर  आले. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत या समस्यांना वाचा फोडून पक्षाचा पाया मजबूत करण्याची संधी राष्ट्रवादीला आहे. या संधीचा लाभ उठविल्यास राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’ पहावयास मिळू शकतात.