होमपेज › Sangli › नायकवडी, आवटी अमृत योजनेचे वाटेकरी

नायकवडी, आवटी अमृत योजनेचे वाटेकरी

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:33AMसांगली: प्रतिनिधी

अमृत योजना अडविल्याचा माझ्यावर आरोप करणारे माजी महापौर इद्रिस नायकवडी आणि सुरेश आवटी हेच त्यातील खरे वाटेकरी आहेत, असा पलटवार महापौर हारुण शिकलगार यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केला. 

ते म्हणाले, यापूर्वीही शासनाच्या लेखापरीक्षणात ताशेरे ओढलेल्या ठेकेदारालाच मिरजेच्या अमृत योजनेचे काम देण्यात त्यांचा इंटरेस्ट काय, त्यांना आताच साक्षात्कार कसा झाला, असे सवालही शिकलगार यांनी उपस्थित केले.मिरजेतील अमृत योजनेतंर्गत मिरज पाणीपुरवठा योजनेचा वाद न्यायालयात आहे. या प्रकरणी काँग्रेसचेच नगरसेवक किशोर लाटणे यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना  नायकवडी आणि आवटी यांनी अमृत योजनेस महापौर शिकलगार  खोडा घालत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात गटनेते जामदार याबद्दल का बोलत नाहीत, असा सवालही नायकवडी यांनी उपस्थित केला होता. 

 शिकलगार म्हणाले, केवळ महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नायकवडी, आवटी हे बेताल आरोप करीत आहेत. आत्ताच त्यांना कसा पुळका आला? दि. 30 नोव्हेंबर 2016 रोजी मी यासंदर्भात ठराव करून पाणी योजनेला सूचक म्हणून सही करीत मंजुरी दिली आहे. योजना सुरू व्हावी  यासाठी विशेष महासभा घेऊन प्रशासनाला शर्ती-अटी घालून ठराव करुन दिला. दोन वर्षे मुदतीत योजना पूर्ण करावी. त्यानंतर योजनेला मुदतवाढ दिली जाणार नाही, अशा काही अटी-शर्ती मी घातल्या. त्यानुसार एकमताने ठराव करण्यात आला आहे. 
ते म्हणाले,  आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी अमृत योजना  वाढीव 8.66 टक्के दराने मंजूर केली. शासनाच्या आदेशाप्रमाणे महासभेला आणि स्थायी समितीला विचारात न घेता परस्पर हा कारभार केला. परस्पर ठेकेदार नियुक्त केला. दोनवेळा निविदाही काढल्या. ठेकेदार मात्र तेच होते.  
ते म्हणाले, अमृत योजनेचा ठेका मिरजेच्या शशांक जाधव यांना देण्यात आला. परंतु त्यांना या पूर्वी 2006 मध्ये मिरजेतीलच कृष्णा घाट ते जॅकवेल शुध्दीकरण केंद्रापर्यतची लाईन टाकण्याचे काम दिले होते. ते काम 3 कोटी 87 लाख रुपयांचे होते. त्याची मुदत दोन वर्षे होती. परंतु ते पूर्ण करण्यास त्यांनी तब्बल सहा वर्षे लावली. त्यामुळे मुदतवाढीनुसार त्याचा खर्च वाढून 4कोटी 57  लाख रुपयांवर गेला. प्रशासनाने मक्तेदाराची 24 रनिंग बिले काढली. याबाबत शासकीय लेखापरीक्षणात ताशेरेही ओढण्यात आले. 

त्यामुळे एवढे मोठे काम त्यांना देणे योग्य नाही. ही गंभीर असल्याबद्दल आम्ही अमृत योजनेचे काम त्या ठेकेदाराल देण्यापूर्वी आयुक्‍तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष का केले?
शिकलगार म्हणाले, पुतळे सुशोभीकरणासारख्या किरकोळ कामांसाठी तीनवेळा निविदा प्रक्रिया राबवली जाते. मात्र  103 कोटींची अमृतसारखी महत्वाची योजना असताना दोनवेळाच प्रक्रिया कशी राबविली? प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने स्थायी, महासभेचे अधिकार डावलून सुरू असलेल्या चुकीच्या कारभाराला विश्‍वस्त म्हणून आम्ही विरोध करणे योग्यच आहे.
 भ्रष्ट कारभारामुळे उद्या कारवाई होऊ नये यासाठीच  संबधित ठेकेदाराची अमृत योजनेची बिले आदा करून नयेत असे  महापौर या नात्याने मी आयुक्तांना  पत्र दिले आहे. तरीही  त्यांनी 3 कोटी 20 लाख रुपयांची  बिले आदा केली आहेत. 

ते म्हणाले, अमृत योजनेसाठी अवश्यक जादा रक्कम देण्याची जबाबदारी शासन किंवा प्रशासन घ्यायला तयार नाही, मग ती  घेणार कोण? अमृत योजनेच्या जादा दराला शासन मान्यता देणार नाही असे पत्र पूर्वीच आले आहे. योजनेचे करारपत्र तांत्रिक माहिती नसणार्‍या  आणि  अधिकार नसताना उपायुक्त करतात कशा? त्या वाढीव 13-14 कोटी रूपये खर्चास जबाबदार कोण?
आंब्याच्या झाडालाच दगड मारतात गटनेते जामदार  म्हणाले,अमृत योजनेचा वाद सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे मी काही बोलणार नाही. योग्यवेळी उत्तर देऊ. नायकवडी यांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले, ‘बाभळीच्या झाडावर कुणी दगड मारत नाहीत; आंब्याच्या झाडालाच दगड मारतात. 
Tags :Nakawadi, Attari Amrit scheme,sangli news