Mon, Jul 06, 2020 23:54होमपेज › Sangli › नागठाणेत राजकीय संघर्षातून कामे ठप्प

नागठाणेत राजकीय संघर्षातून कामे ठप्प

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 8:08PMवाळवा : धन्वंतरी परदेशी

बालगंधर्व नगरी नागठाणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालयासाठी 54 लाख रुपये मंजूर झाले. मात्र सत्तारुढ काँगे्रस आणि विरोधी भाजप  यांच्यामधील संघर्षामुळे हे काम ठप्प झाले आहे.नागठाणे येथे ग्रामसचिवालय  व्हावे म्हणून भाजपचे पंचायत समिती सभापती सीमा मांगलेकर, तालुकाध्यक्ष विजय पाटील, प्रकाश मांगलेकर व कार्यकर्त्यांनी ग्रामसेवकाकडून प्रस्ताव घेवून तो मंजूर करून आणला. पहिल्या हप्त्याचे 12 लाख रुपये मिळाले.  बांधकामाचा शुभारंभही करण्यात आला. मात्र या कामावर सरपंच, उपसरपंच आणि काही सदस्यांनी बहिष्कार टाकला. 

ग्रामसचिवालयाच्या पायाभरणी समारंभासाठी आम्हाला विश्‍वासात न घेता परस्परच हा कार्यक्रम घेतल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. तर ग्रामसचिवालयाचे बांधकाम करणे, निर्लेखन करणे, पाडणे इथपर्यंतच्या कार्यक्रमात सरपंच, उपसरपंच आदी सहभागी होते, असा आरोप विजय पाटील यांनी केला आहे. ग्रामपंचायत काँगे्रसच्या ताब्यात आहे. ग्रामसचिवालयाचा  पायाभरणी  कार्यक्रम विश्‍वासात न घेता केल्यामुळे  पंचायतीने बांधकाम करणार्‍या कंत्राटदाराला त्वरित काम थांबविण्याचा लेखी आदेश दिला आहे. तर ग्रामपंचायतीने विरोध करू नये यासाठी विजय पाटील व भाजपचे कार्यकर्ते यांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन करून पुढे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.  या सार्‍या खेळात गावातील विकास कामे ठप्प होऊ लागल्याचा गावकर्‍यांचा आरोप आहे.