Mon, Sep 16, 2019 12:22होमपेज › Sangli › ‘राष्ट्रवादी अध्यक्ष’वरुन तासगावात घमासान

‘राष्ट्रवादी अध्यक्ष’वरुन तासगावात घमासान

Published On: Jun 19 2018 1:25AM | Last Updated: Jun 18 2018 7:41PMतासगाव : दिलीप जाधव 

अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदावर ठाण मांडून बसलेले हणमंतराव देसाई यांनी राजीनामा दिला. आता तालुका अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे  द्यायची, यावरुन  पक्षनेतृत्व आणि पदाधिकारी यांच्यात घमासान सुरू झाले आहे.या पदावर आयारामांना संधी देण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला असल्याची चर्चा होत आहे. यामुळे निष्ठावंतांतून संतापाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नवीन तालुकाध्यक्ष निवडताना आमदार सुमन पाटील व सुरेशभाऊ पाटील यांच्यासह पक्ष नेतृत्वाचा कस लागणार आहे. 

आतापर्यंत या पदासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती विश्वास माने-पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, राजापूरचे डी. के.  पाटील यांच्या नावाची चर्चा होती. आमदार पाटील यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढविलेले स्वप्निल पाटील यांनी हल्लाबोल यात्रेदरम्यान   राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे वडील दिलीप पाटील यांचे नाव तालुकाध्यक्ष पदासाठी आता  पुढे आले आहे.मात्र आमदार सुमनताई व सुरेश पाटील याबाबत मौन बाळगून आहेत. तर पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात  पडले आहेत. कारण पक्षनेतृत्वाने दिलीप पाटील यांना तालुकाध्यक्ष पदाचा शब्द देऊनच राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याची  चर्चा अंतर्गत गोटात रंगली आहे.

पक्ष नेतृत्वाचा कस 

काही दिवसांपूर्वी तासगाव नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकाची निवड झाली. एकेकाळचे खासदार समर्थक असलेल्या माजी नगराध्यक्षांचा प्रवेश घेऊन त्यांना हे पद द्यायचा निर्णय झाला होता. परंतु निष्ठावंतांना न्याय द्यायचा हट्ट धरुन आबांचे बंधू सुरेश पाटील यांनी स्वप्निल जाधव यांना उमेदवारी दिली. मग आता निष्ठावंतांचा बळी देऊन अध्यक्षपद आयारामांना देण्याचा घाट  कशासाठी घातला आहे, असा प्रश्न पदाधिकारी खासगीत विचारत आहेत. शिवाय आबांच्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय सर्व पक्षांनी घेतला. मात्र काहींनी  याला खो घातला. सुमनताईंच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्या घरातच अध्यक्षपद देऊन नेतृत्वाला काय साध्य करायचे आहे, हे कळायला मार्ग नाही, अशा भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. यामुळे अध्यक्ष निवडताना आमदार सुमनताईंच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.