Tue, Jul 14, 2020 03:00होमपेज › Sangli › सांगली : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला नगरसेविकेच्या पतीकडून मारहाण

सांगली : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला नगरसेविकेच्या पतीकडून मारहाण

Published On: Jun 25 2019 2:23PM | Last Updated: Jun 25 2019 2:23PM
सांगली : प्रतिनिधी 

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका मुख्यालयात नगरसेवक योगेंद्र थोरात यांना नगरसेविकेच्या पतीकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. अभिजित हारगे असे या मारहाण करणाऱ्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. आज, मंगळवारी (दि. २५) दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिकेच्या मुख्यालयात हा प्रकार घडला. या प्रकारामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात दोघांनी एकमेकांविरोधात धाव घेतली. यावेळी पोलिस ठाण्यासमोर दोन्ही गटांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती.

थोरात व नगरसेविका संगीता हारगे, स्वाती पारधी हे मिरजेच्या प्रभागामधून राष्ट्रवादीतून निवडून आलेले आहेत. संगीता हारगे या प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे पती अभिजित हारगे यांचा या प्रभागात वरचष्मा असतो. प्रभागातील कामे त्यांना विचारूनच केली जावीत असा हारगे दांपत्याचा दबाव असल्याचा थोरात यांचा आरोप आहे. थोरात यांनी  प्रभागातील काही कामे प्रस्तावित केली आहेत. या मुद्यावरून दोघांमध्ये काही दिवस वाद सुरू आहे. 

दरम्यान, मंगळवारी थोरात हे महापालिकेत कामानिमित्त आले होते. यावेळी अभिजीत हारगे व संगीता हारगे महापालिकेत आले. त्यांनी थोरात यांना कामावरून जाब विचारला. यातून तू तू मै मै वाद वाढत गेला. संतप्त झालेल्या अभिजित यांनी थोरात यांना मारहाण करत शिवीगाळ केली. या मारहाणीत थोरात यांच्या तोंडातून रक्त येऊन जखमी झाले. त्या प्रकारामुळे महापालिकेत तणाव निर्माण झाला. हा प्रकार समजताच हारगे समर्थक महापालिकेत मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दोन्ही गटाने समोरच असलेल्या शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.