Sun, May 31, 2020 22:24होमपेज › Sangli › तुंगच्या बालिकेचा खून; धागेदोरे हाती

तुंगच्या बालिकेचा खून; धागेदोरे हाती

Last Updated: May 24 2020 1:28AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा
तुंग (ता. मिरज) येथील विठलाईनगर-चांदोली वसाहतीतील सातवर्षीय बालिकेच्या खूनप्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. पोलिसांची चार पथके या प्रकरणाचा तपास करीत आहेत. बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. याबाबत अज्ञाताविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शनिवार किंवा रविवारपर्यंत या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

बालिकेच्या वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.  बालिका बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास खाऊ आणायला दुकानात गेली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नव्हती. रात्रभर तिचा शोध सुरू होता. गुरुवारी सकाळी उसाच्या शेतात तिचा मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडला होता. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्‍त अधीक्षक  मनिषा डुबुले यांच्यासह अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण, उपअधीक्षकांच्या पथकासह ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस  या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. गुरुवारी दिवसभरात पोलिसांनी चांदोली वसाहतीतील लोकांसह ग्रामस्थांकडेही चौकशी केली. मात्र ठोस धागेदोरे  हाती लागले नव्हते. 

शुक्रवारी सकाळी पुन्हा जोमाने तपासास सुरूवात करण्यात आली.  त्या दुकानातून खाऊ घेऊन बाहेर पडल्यानंतर ती  बालिका दुकानासमोरच कुत्राच्या पिलांसोबत खेळत होती. त्यानंतर तिला कोणीच पाहिलेले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर गुन्हेगार शोधण्याचे आव्हान आहे. 

डीएनए चाचणीसाठी नमुने
दरम्यान पीडित मुलीचे डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. शिवाय व्हिसेराही राखून ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तिचा स्वॅबही तपासणीसाठी घेतल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.