होमपेज › Sangli › काँग्रेसमधील घडामोडींमुळे भाजपमध्येही हालचाली

काँग्रेसमधील घडामोडींमुळे भाजपमध्येही हालचाली

Published On: Mar 16 2019 2:34AM | Last Updated: Mar 16 2019 2:28AM
सांगली : प्रतिनिधी

सांगली लोकसभा  जागेसाठी  काँग्रेसमध्ये  कुरघोड्यांचे नाट्य रंगले आहे. त्या पाठोपाठ आता भाजपमध्येही हालचाली गतिमान झाल्या आहेत. विद्यमान खासदार संजय पाटील यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा दावा सुरू आहे. दुसरीकडे भाजपच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांनी धोका कमी झाल्याचा दावा करीत पाटील यांच्याऐवजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उमेदवारी द्यावी, यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत दोन दिवसांत  फैसला होणार आहे. 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. सांगलीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होईल, असा दावा सुरू होता. परंतु भाजपमध्येही उमेदवारीवरून गटबाजी सुरू आहे. परंतु काँग्रेसचा उमेदवार असेल  त्यावर भाजपच्या उमेदवारीचा फैसला करू, असा पवित्रा पक्षश्रेष्ठींनी घेतला होता. परंतु गुरुवार-शुक्रवारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी पक्षाला जागा देण्याचा विषय ऐरणीवर आला. त्यानुसार सांगलीतील काँग्रेसची उमेदवारी बदलून स्वाभिमानीला देण्याच्या हालचालीवरून काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली. 

या पाश्‍वर्र्भूमीवर भाजपची उमेदवारी बदलण्याच्या मोहिमेत लोकप्रतिनिधींसह काही बड्या नेत्यांनीही उडी घेतल्याची चर्चा  आहे.  दुसरीकडे संजय पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याची भूमिकाही काहींनी व्यक्त केली आहे.

उमेदवार पाहून नव्हे; पक्ष म्हणून तयारी ठेवा 

भाजपमधील गटबाजी आणि त्यातून उमेदवारीबाबत सुरू चाललेल्या हालचालींमुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र पक्षश्रेष्ठींनी उमेदवार कोणीही असो, प्रचार यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा प्रदेशाध्यक्ष, विविध समित्यांकडून दररोज लेखाजोखा घेतला जात आहे. उमेदवार कोण ते पाहू नका, पक्षाला बहुमत हेच टार्गेट असेल, असे मुख्यमंत्र्यांसह कोअर कमिटीने आदेश दिले आहेत.