होमपेज › Sangli › विद्यार्थ्यांपेक्षा 11566 प्रवेश क्षमता जादा

विद्यार्थ्यांपेक्षा 11566 प्रवेश क्षमता जादा

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 12 2018 8:39PMसांगली : उध्दव पाटील

दहावीचा निकाल जोरात लागला आहे. जिल्ह्यातील 38 हजार 478 नियमित व 650 रिपीटर असे एकूण 39 हजार 128 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी तब्बल 11 हजार 126 आहेत. विद्यार्थी व पालकांना आता अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, संयुक्त, इतर, डिप्लोमा, ‘आयटीआय’कडील प्रवेश क्षमता 50 हजार 694 विद्यार्थी इतकी आहे. जिल्ह्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांहुनि 11 हजार 566 प्रवेश क्षमता जादा आहे. मात्र ठराविक कॉलेज, ठराविक शाखांकडे प्रवेशासाठी कल अधिक असतो. त्यामुळे देणगीचा ‘बाजार’ही दरवर्षीच भरत असतो. 

जिल्ह्यात कला शाखेची प्रवेश क्षमता 19 हजार 600 आहे. वाणिज्य 4 हजार 480, विज्ञान 15 हजार 440, ‘संयुक्त’ची प्रवेश  क्षमता 2 हजार,  इतर (एमसीव्हीसी) प्रवेश क्षमता 960 आहे. जिल्ह्यात डिप्लोमा कॉलेज 16 आहेत. तेथील प्रवेश क्षमता 5 हजार 214 आहे. जिल्ह्यात शासकीय 10 आणि खासगी 15 अशी एकूण 25 आयटीआय कॉलेज आहेत. त्यांची प्रवेश क्षमता 3 हजार आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, संयुक्त, इतर, डिप्लोमा, ‘आयटीआय’कडील प्रवेश क्षमता 50 हजार 694 आहे. विद्यार्थ्यांहुनि प्रवेश क्षमता जादा असली तरी ठराविक उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा अधिक  दिसून येते. 

विनाअनुदानितचे ओझे का? 

जिल्ह्यात शासन अनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांबरोबरच विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यामध्येही प्रवेश होत असतात. या कनिष्ठ महाविद्यालयांना शासन अनुदान नसल्याने व्यवस्थापन खर्च (शिक्षक पगार व अन्य खर्च) विद्यार्थ्यांकडून ‘फी’च्या रुपाने घेतला जातो. विनाअनुदानितचे हे आर्थिक ओझे विद्यार्थी-पालकांच्या माथी न मारता ते शासनाने पेलणे गरजेचे आहे. काही विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेच्या अभ्यासक्रमासाठी निश्‍चित केलेल्या शैक्षणिक शुल्कहून अधिक रक्कम घेतली जाते, अशा तक्रारी दरवर्षीच होत असतात. 

‘अनुदानित’मध्येही ‘डोनेशन’

काही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान प्रवेशासाठी डोनेशन घेतले जाते. त्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. प्रवेश नाकारण्यासाठी त्यांची कारण तयार असतात. प्रवेश फुल्ल झाल्याचे सांगितले जाते. पण ‘देणगी’ची खात्री देताच प्रवेश निश्‍चित होतो. विद्यार्थी व  पालकांची ही आर्थिक लुबाडणूकही दरवर्षीच होत असते. मात्र त्यावर कोणत्याच यंत्रणेचे नियंत्रण दिसत नाही. शिक्षण विभागाने यावर्षी असे प्रकार घडणार नाहीत याची पुरेपुर दक्षता घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी, पालकांकडून तक्रार आली तरच त्याची दखल घेणे ही नेहमीची भुमिका यावेळी सोडून देणे आवश्यक आहे. संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन अकरावी प्रवेश प्रक्रियेवर ‘वॉच’ ठेवणे आवश्यक आहे. तशी पालकांची मागणी आहे. 

वाणिज्यकडे कल 21.75 टक्के; प्रवेश क्षमता 9 टक्के

दहावीनंतर पुढे काय, असा प्रश्‍न विद्यार्थी पालकांच्या मनामध्ये असतो. पुढील अभ्यासक्रमासाठी अनेक वाटा आहेत. मात्र आपली आवड, कल कोणत्या शाखेकडे आहे हे ओळखता आले तर पुढील करिअरसाठी नेमकी कोणती वाट पकडावी हे समजणे सहज सोपे होते. त्याचसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मानसशास्त्र विभागांतर्गत श्यामची आई फाऊंडेशनतर्फे दहावीतील विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जाते. सन 2018 ची कलचाचणी पाहता राज्यात सर्वाधिक 21 टक्के विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे आहे. कोल्हापूर विभागातील (सांगली, कोल्हापूर, सातारा हे तीन जिल्हे मिळून) 21.75 टक्के विद्यार्थ्यांचाही कल ‘वाणिज्य’कडे आहे. पण सांगली जिल्ह्यात ‘वाणिज्य’ची प्रवेश क्षमता 4480 (8.83 टक्के) आहे.