Sat, Jul 04, 2020 02:13होमपेज › Sangli › मंगरूळ येथे पहिला केटी वेअर अधिक सिमेंट बंधारा

मंगरूळ येथे पहिला केटी वेअर अधिक सिमेंट बंधारा

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 27 2018 8:22PMविटा : विजय लाळे 

राज्यातील  अनोख्या बंधार्‍याचा पहिला  प्रयोग येरळेची उपनदी असलेल्या रेवणगंगा नदीवर सांगली जिल्ह्यात यशस्वीरीत्या साकारला आहे. कोल्हापूर पध्दतीचा अधिक सिमेंट बंधारा, असा बंधारा मंगरूळ (ता. खानापूर) येथे बांधण्यात आला. गतसप्ताहात  टेंभू योजनेच्या सोडलेल्या पाण्याने हा बंधारा आता तुडूंब भरला आहे.   खानापूर तालुक्यात श्री रेवणसिद्ध डोंगर  परिसरातून उगम पावलेली रेवणगंगा नदी जवळपास  20 ते 22 किलोमीटर लांबीची आहे. पावसाळ्याचे चार दोन आठवडे सोडले तर रेवणगंगा नेहमीच कोरडी असते.  या नदीला वाहते करण्यासंदर्भात अनेकांनी अनेक पर्याय सुचविले, मात्र त्याला यश आले नाही.   पावसाच्या पाण्याबरोबरच बाहेरून कोणत्यातरी योजनेचे पाणी आणणे आवश्यक होते. मंगरुळचे ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील यांनी आळसंद येथील तलावाजवळून ताकारी योजनेचे पाणी उताराने या नदीत येऊ शकते, असा पर्याय सुचवला होता. परंतु राजकीय इच्छा शक्ती अभावी तो साकारला नाही.  

आमदार अनिलराव बाबर यांनी मात्र आपली राजकीय ताकद पणाला लावून टेंभू योजनेचे पाणी  खानापूर तासगाव कालव्याद्वारे नदीपर्यंत आणले आहे. पारे गावाजवळ टेंभू योजनेच्या कालव्यातून पाणी या नदीत सोडले आहे.  पारे तलावातून पुढे  पारे, चिंचणी, मंगरूळ, तासगाव तालुक्यातील लिंब, बोरगाव मार्गे राजापूर जवळ ही नदी येरळेला मिळते. मंगरूळ येथे  हा के. टी. वेअर आणि सी. एन. बी. असा हा अनोखा बंधारा बांधलेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी के. टी. वेअर्स, सिमेंट बंधारे बांधले जातात. परंतु या ठिकाणी बंधारा सिमेंट तर  के. टी. वेअर प्रमाण बंधार्‍यास  दोन लोखंडी दरवाजे  आहेत.   यासाठी 43 लाख रुपये खर्च आला. दि. 25 फेब्रुवारीरोजी बांधकाम सुरू झाले आणि दि. 8 मार्चला ते पूर्ण झाले.   सर्व बांधकाम सिमेंट बंधार्‍याप्रमाणेच वर 1 मीटर आणि खाली 4 मीटर रुंदीचे आहे. बंधार्‍याची  लांबी 40 मीटर तर खोली 4 मीटर आहे. त्यामुळे मागे 1 किलो मीटरपर्यंत पाणीसाठा झालेला आहे, असे कंत्राटदार विलास पाटील यांनीयावेळी बोलतानासांगितले. 

भाग समृद्ध होईल : बाबर

आमदार अनिलराव बाबर  म्हणाले,  मंगरूळ गावात या नदीवर बंधारे व्हावेत, अशी अनेक दिवसांची  मागणी होती. सिमेंट बंधार्‍यात थोडासा बदल करून के. टी. वेअर प्रमाणे हा बांधला आहे.  या गावात आणखी दोन असेच बंधारे बांधणार आहे.  वर्षातून तीन चार आवर्तनात टेंभूचे पाणी मिळाले तर हा भाग समृद्ध होईल.