होमपेज › Sangli › इस्लामपुरात दोन टोळ्यांना ‘मोका’

इस्लामपुरात दोन टोळ्यांना ‘मोका’

Published On: Jan 23 2019 1:06AM | Last Updated: Jan 23 2019 1:06AM
इस्लामपूर : वार्ताहर

इस्लामपूर शहरातील दोन संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी मोका कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. या कायद्यानुसार इस्लामपूर उपविभागातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे शहरासह तालुक्यातील गुन्हेगारी वर्तुळाचे धाबे दणाणले आहेत. इस्लामपूर उपविभागाचे नूतन पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सूत्रे हाती घेताच या कारवाईने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. 

गुंड सोन्या शिंदे टोळीतील  सोनम बाळासाहेब शिंदे (वय 33, रा. मंत्री कॉलनी इस्लामपूर), मुज्या ऊर्फ मुज्जमिल रमजान  शेख (25, रा. नालबंद कॉलनी इस्लामपूर), जयेश बाबुराव माने (29, रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर), नितीन संजय पालकर (27, रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर), वैभव विक्रम पाटील (28, रा. कापूसखेड नाका, इस्लामपूर), सुरेश सुभाष बाबर (23, मंत्री कॉलनी, इस्लामपूर) यांना मोका लावला आहे.अनमोल मदने टोळीतील अनमोल मानसिंग मदने (21, रा. किसाननगर, इस्लामपूर),  गुरूसिद्ध लक्ष्मण जाधव (21, रा. टकलाईनगर, इस्लामपूर), हर्षल ऊर्फ हर्षवर्धन अशोक घेवदे (रा. इस्लामपूर), रवि चौगुले (रा. इस्लामपूर) या 10 जणांवर मोका  कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

सोन्या शिंदेच्या टोळीवर एक खून, तीन खुनाचे प्रयत्न, खंडणीचे तीन, जबरी चोर्‍या चार, बेकायदेशीर जमाव जमविणे पाच, दुखापतीचे व किरकोळ सहा असे तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत. अनमोल मदने टोळींवर  दोन खुनाचे प्रयत्न, एक दरोडा, दुखापती तीन, रॉबरी दोन, बेकायदेशीर जमाव जमवणे तीन असे 13 गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुंडगिरीने थैमान घातले होते. भर दिवसा खंडणीचे, मारामारीचे प्रकार घडत होते. अनमोल मदने टोळीने तर भरदिवसा शहरातून नंग्या तलवारी नाचवत धुडगूस घालत पोलिसांनाच आव्हान दिले होते. या सर्वांना अटक करुन पोलिस 
निरीक्षक विश्‍वास साळोखे यांनी चारवेळा त्यांची शहरातून धिंड काढली होती. 

शहरात गुन्हेगारीचे वातावरण असताना  चार दिवसांपूर्वी  इस्लामपूरच्या पोलिस उपअधीक्षकपदाची सुत्रे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी स्वीकारली. पदभार स्वीकारताच त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून या दोन टोळ्यांना मोका लावण्याचे प्रस्ताव तयार केले. जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यामार्फत हे प्रस्ताव कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले  होते. नांगरे-पाटील यांनी तातडीने सोमवारी रात्री या प्रस्तावास मंजुरी दिली. शहरातील या दोन टोळ्यांना मोका लागल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र अजूनही शहरातील काही टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत. 

सात जणांना अटक; तिघे फरार...

सोन्या शिंदे टोळीतील मुज्जमिल, जयेश, नितीन, सुरेश, सोनम तर मदने टोळीतील अनमोल, गुरुसिद्ध यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे टोळीतील वैभव व मदने टोळीतील हर्षवर्धन, रवि हे फरारी आहेत.

‘मोका’ची पहिलीच कारवाई...

सन 1999 मध्ये मोका कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर 20 वर्षांनी इस्लामपूर उपविभागात या कायद्यान्वये ही पहिलीच कारवाई झाली आहे. एकाच वेळी दोन टोळ्यांना मोका लावून उपअधीक्षक पिंगळे यांनी गुन्हेगारांना चांगलाच दणका दिला आहे.