Fri, Jul 10, 2020 01:48होमपेज › Sangli › ‘मिरज पश्‍चिम भाग’आष्टा तहसीलमध्ये?

‘मिरज पश्‍चिम भाग’आष्टा तहसीलमध्ये?

Published On: Jun 07 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 8:08PMसांगली : प्रतिनिधी

आष्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालयास सोमवारी राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीने पदसंख्येसह मंजुरी दिली. या  कार्यालयास कसबे डिग्रज, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी ही गावे जोडण्याची शक्यता असून तशा हालचाली सुरू आहेत. सांगली जिल्ह्यात दहा तालुके आहेत. मात्र आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. जत तालुक्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू केले आहे. त्याप्रमाणे सांगली स्वतंत्र तालुका व्हावा, अशीही  मागणी आहे. त्यानुसार अप्पर तहसील कार्यालयास अर्थ आणि नियोजन विभागाने मान्यता दिली आहे. या कार्यालयाची लवकरच घोषणा होणार आहे. 

याच दरम्यान आष्टा येथेही अप्पर तहसीलला मंजुरी मिळाल्याची माहिती इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील व भाजपचे जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे यांनी दिली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौर्‍यावर  आले असता  पहिल्या टप्प्यात आष्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. सोमवारी उच्चस्तरीय समितीने पदसंख्येसह अतिरिक्त तहसील कार्यालयाला मंजुरी दिली.  हे कार्यालय लवकर सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान लोकसंख्येच्या प्रमाणात हे अप्पर तहसील करण्यासाठी मिरज तालुक्याच्या पश्‍चिम भागातील काही गावे  जोडण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. यामध्ये   कसबे डिग्रज, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी ही गावे समाविष्ट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  कारण ही गावे सध्या वाळवा विधानसभा मतदारसंघात आहेत.   मात्र आष्टा अप्पर तहसीलला ही गावे जोडल्यास काही लोकांना ते गैरसोयीचे ठरणार आहे.

कवलापूर सांगली अप्परला जोडण्याची मागणी

सांगली अप्पर तहसील कार्यालयास बुधगाव, माधवनगर, कुपवाड वॉन्लेसवाडी, बामणोली, बिसूर, नांद्रे, वाजेगाव, कावजी खोतवाडी आदी गावे जोडण्यात येणार आहेत. मात्र यामध्ये कवलापूरचा समावेश नाही. कवलापूरच्या लोकांना मिरजेपेक्षा सांगली हे ठिकाणी सोईचे आहे. त्यामुळे कवलापूरचा समावेश सांगली अप्पर तहसीलमध्ये करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.