Tue, Jul 14, 2020 03:00होमपेज › Sangli › मिरजेचे तीन जावई, एक नातू आमदार

मिरजेचे तीन जावई, एक नातू आमदार

Last Updated: Nov 01 2019 9:14PM
मिरज : जालिंदर हुलवान
मिरज तालुक्यातील म्हैसाळ व बेडग या गावचे तीन जावई व एक नातू असे चार जण यंदा आमदार झाले आहेत. म्हैसाळचे जावई जयंत पाटील, बेडगचे जावई पृथ्वीराज चव्हाण व धनंजय मुंडे तर बेडगचे नातू विनय कोरे हे चारही आमदार राज्याच्या राजकारणात पॉवरफुल्ल नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. 

मिरज शहर आणि तालुका ऐतिहासिक  आहे. मिरजेला जसा आरोग्य, सांस्कृतिक वारसा आहे. तसा राजकीय वारसाही आहे. मिरजेच्या पहिल्या आमदार होण्याचा मान हा महिलेला मिळाला होता. कळंत्रेआक्का या मिरजेच्या पहिल्या आमदार होत्या.  

नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली. यामध्ये मिरजेत सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे हे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच या निवडणुकीमध्ये मिरज तालुक्यातील तीन जावई व एक नातूही आमदार बनले आहेत.  

काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मिरज तालुक्यातील बेडग गावचे जावई आहेत. अभ्यासू वक्ते आणि उत्तम प्रशासक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.  पृथ्वीराज चव्हाण हे खासदार बनले. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. दि. 9 नोव्हेंबर 2010 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रभावीपणे काम केलेे होते. आता ते कराड मतदारसंघातून निवडून आले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील हे मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावचे जावई आहेत. जयंत पाटील हे मिरजेचे माजी आमदार (स्व.) मोहनराव शिंदे यांचे जावई व मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांचे मेहुणे आहेत. राज्य मंत्रीमंडळात अर्थ, गृह आणि ग्रामीण विकास अशा खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.

राष्ट्रवादीचे आणखी एक तडफदार नेते बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे हे देखील बेडग गावचे जावई आहेत.  धनंजय मुंडे हे विधान परिषदेचे आमदार होते.  विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी अतिशय प्रभावी असे काम केले आहे. आता ते परळी मतदारसंघातून विजयी  झाले आहेत.

जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री विनय कोरे हे देखील बेडग गावचे नातू आहेत. त्यांच्या आजी सावित्री कोरे या बेडगच्या आहेत. विनय कोरे हे 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार बनले. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा - शाहूवाडी मतदारसंघातून निवडून येऊन चौथ्यांदा आमदार बनले आहेत.