Wed, Jul 08, 2020 03:08होमपेज › Sangli › ‘हातकणंगले’त महाडिक गट महायुतीसोबत

‘हातकणंगले’त महाडिक गट महायुतीसोबत

Published On: Apr 03 2019 1:51AM | Last Updated: Apr 02 2019 10:54PM
इस्लामपूर : प्रतिनिधी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आम्हाला कोणीही गृहीत धरू नये, अशी भूमिका घेतलेल्या नानासाहेब महाडिक गटाने आता महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाळवा-शिराळ्यात सक्रिय असलेल्या महाडिक गटाच्या या भूमिकेचे पडसाद कोल्हापूर मतदारसंघात तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही उमटणार आहेत. 

वाळवा-शिराळा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेला नानासाहेब महाडिक गट या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर राहणार, याविषयी  औत्सुक्य होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पेठनाका येथे नानासाहेब महाडिक तसेच पंचायत समितीमधील गटनेते राहुल महाडिक व माजी जि.प. सदस्य सम्राट महाडिक यांच्याशी चर्चा केली. 

त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील शिष्टाई केली.त्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाडिक गटाने महायुतीसोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला. पेठ येथे वाळवा-शिराळा तालुक्यातील महाडिक गट व विकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात महाडिक गटाची भूमिका जाहीर झाली. 

दोन्ही तालुक्यांतील आमदार जयंत पाटील यांचे विरोधक हे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील, अशी घोषणा महाडिक यांनी केली. या बैठकीस महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासह या परिसरातील अनेक पदाधिकारी व  नगरसेवक उपस्थित होते. गेली 30 वर्षे या परिसरात विरोधी गट टिकवून ठेवून विरोधकांचे आव्हान कायम ठेवण्याचे काम महाडिक यांनी केल्याचा उल्लेख सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या भाषणात केला होता. 

धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी राजू शेट्टी सक्रिय राहतील. वाळवा-शिराळ्यात मात्र महाडिक गटाने खा. शेट्टी यांच्या विरोधात अन् धैर्यशील माने यांच्या बाजूने मैदानात उतरून दंड थोपटले आहेत. त्याबद्दल पेठ येथील मेळाव्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही नानासाहेब महाडिक यांचे कौतुक केले होते. मात्र, महाडिक यांच्या येथील भूमिकेमुळे आता कोल्हापूरमध्ये शेट्टी यांची भूमिका कोणती राहणार, याबद्दल कुतूहल आहे.

गेल्या 30-35 वर्षांत महाडिक गटाने इतर अनेक गटांना आणि नेत्यांना मदत केली आहे. त्याच धर्तीवर या लोकसभा निवडणुकीतही भाजप-सेनेच्या उमेदवाराला या परिसरातील महाडिक गटाची साथ मिळणार आहे. सम्राट महाडिक शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी आधीपासूनच कामाला लागले आहेत. तर राहुल इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महाडिक गटाच्या या निर्णयाने आगामी विधानसभा निवडणुकीचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळची  पेरणी अप्रत्यक्षपणे होऊ लागली आहे. अलीकडे सदाभाऊ खोत आणि महाडिक   गटाची सलगी अधिक वाढली होती. त्यातच आता भर पडून महाडिक गट आणि खोत यांची रयत क्रांती पुन्हा एकत्र आल्याचेही अधोरेखित झाले आहे. 

जयंत पाटील यांच्याविरोधात महाडिक गटाची भूमिका पूर्वीप्रमाणेच

गेल्या दोन-तीन दशकांपासून सातत्याने वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांच्याविरोधात महाडिक गट राहिला आहे. या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी-काँगे्रस-स्वाभिमानीतून खासदार राजू शेट्टी हे उमेदवार असल्याने त्यांच्या प्रचाराचा नारळ जयंत पाटील यांच्या उपस्थितीतच फुटला. त्यामुळे साहजिकच जयंत पाटील यांच्याविरोधात महाडिक गटाची भूमिका पूर्वीप्रमाणेच स्पष्ट झाली आहे. अर्थात, यावेळचे वेगळेपण म्हणजे हातकणंगले मतदारसंघ ज्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. त्या कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक हे रिंगणात आहेत. धनंजय महाडिक हे नानासाहेब महाडिक यांचे पुतणे आहेत.