तासगाव : प्रतिनिधी
विसापूर-पुणदी योजनांबाबत खासदार संजय पाटील यांनी राजकारण केले. त्यामुळे तासगाव तालुक्यात पाणी कमी मिळत आहे, अशी टीका स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांनी केली.
तासगाव तालुक्यातील प्रचार दौर्यात येळावी येथे ते बोलत होते. ढवळी, तुरची, निमणी, येळावी, राजापूर, बोरगाव, शिरगाव, हातनूर, विसापूर, मांजर्डे, मोराळे, वायफळे या गावांचा प्रचारदौरा केला.
दौर्यात आमदार सुमनताई पाटील, विजय पाटील, अविनाश पाटील यांच्यासह सर्व गावांतील नेते सहभागी झाले होते.
पाटील म्हणाले, आम्ही ज्यांना ताकद दिली त्यांनी आमच्यावर वार केला. पण जो साप पाळतो त्याला सापाचे दात काढून ठेचताही येते. आम्ही दूध पाजले, ताकद दिली. सांगलीत नगरसेवक केले. 1999 ला काँग्रेसचे तिकिट दिले आणि त्यांनी पुढे गुंडगिरी सुरू केली. ज्यादिवशी त्यांनी आर. आर. आबांच्या कुटुंबाला कोंडून त्यांच्यावर हल्ला केला त्या दिवशी त्यांची गुंडगिरी संपविण्याचे आम्ही ठरविले आहे. कोणत्याही विरोधाला त्यापेक्षा कडवटपणे उत्तर दिले जाईल.
द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न सोडवू
खासदार राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांना न्याय मिळवून दिला. त्याप्रमाणे आम्ही द्राक्ष बागायतदारांच्या पाठिशी राहू. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. विसापूर-पुणदी योजना सांगली कारखान्याला चालवायला द्या. त्याचा जो काही पाणीपट्टीचा खर्च असेल तो आम्ही करू. शेतकर्यांकडून एक रुपयाही घेणार नाही, अशी मागणी आम्ही केली होती. पण असे झाले तर या भागात वसंतदादा कुटुंबाचा जिव्हाळा वाढेल, म्हणून त्यांनी ही योजना आम्हाला दिली नाही, असा आरोप पाटील यांनी केला.