Thu, Jul 02, 2020 12:36होमपेज › Sangli › इस्लामपूर : शिंदे, मदने टोळीतील १० जणांवर मोका अंतर्गत कारवाई

इस्लामपूर : शिंदे, मदने टोळीतील १० जणांवर मोका अंतर्गत कारवाई

Published On: Jan 22 2019 6:03PM | Last Updated: Jan 22 2019 6:05PM
इस्लामपूर (सांगली) : वार्ताहर

इस्लामपूरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. शहरात दहशत माजवणाऱ्या या गुन्हेगारांना इस्लामपूर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. दोन गुन्हेगारी टोळ्यातील १० जणांवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. मोका अंतर्गत इस्लामपूरातील ही पहिलीच कारवाई आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

गुंड सोनम शिंदे गँग मधील सोन्या शिंदे, मुज्जमिल शेख, जयेश माने, नितीन पालकर, वैभव पाटील, सुरेश सुभाष बाबर. तर अनमोल मदने गँगमधील अनमोल मदने, गुरू जाधव, रवी चौगुले, हर्षवर्धन घेवदे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या दोन्ही टोळ्यावर खंडणी, मारामारी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गेल्या काही दिवसापासून शहरात गुंडगिरीने थैमान घातले होते. भर दिवसा खंडणीचे, मारामारीचे प्रकार घडत होते. अनमोल मदने गँगने तर भरदिवसा शहरातून नंग्या तलवारी नाचवत धुडगूस घालत पोलीसांनाच आव्हान दिले होते. या सर्व जणांना अटक करुन पोलिस निरीक्षक विश्र्वास साळोखे यांनी चार वेळा त्यांची शहरातून धिंड काढली होती. 

नुतन पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी या दहा जणांच्यावर मोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करुन जिल्हा पोलिसप्रमुखांच्या मार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्र्वास नांगरे पाटील यांच्याकडे पाठवला होता. विशेष पोलिस महानिरीक्षक पाटील यांनी हा प्रस्ताव मंजुर केला. यानंतर इस्लामपूर पोलिसांनी या दोन्ही टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली.