Thu, May 23, 2019 23:16होमपेज › Sangli › भाजप पदाधिकार्‍यांकडून भूमी अभिलेख कर्मच्यार्‍यांवर हल्‍ला

भाजप पदाधिकार्‍यांकडून भूमी अभिलेख कर्मच्यार्‍यांवर हल्‍ला

Published On: Jun 14 2018 6:05PM | Last Updated: Jun 14 2018 6:05PMसांगली : प्रतिनिधी

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी  जिल्हा भूमिअभिलेखच्या येथील कार्यालयातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत भ्याड हल्ला केल्याचा आरोप  सांगली जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने केला आहे. त्याच्या निषेधार्थ आज काळ्याफिती लावून एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन केले. 

दरम्यान संघटनेने संबंधितावर करवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे, शिंदे बुधवारी अचानक नक्कल विभागात आले. त्यांनी त्यांचे वैयक्तीक कोणतेही काम नसताना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील दूरध्वनी संच उचलून आपटला. यापूर्वीही त्यांनी कार्यालयात गोंधळ घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला अशा प्रवृत्तीमुळे शासकीय कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. जनतेने शासकीय कामकाजाबाबत तक्रारी असल्यास सनदशीर मार्गाने कारवाईची मागणी करणे गरजेचे आहे. कायदा हातात घेणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. दरम्यान भूमिअभिलेखचे अधिकारी विष्णू शिंदे याबाबत बोलण्यास नकार दिला.

भूमि अभिलेखचे कर्मचारी निर्डावलेले आहेतः शिंदे

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी निर्डावलेले आहेत. सामान्य लोकांची  कामे अनेक वर्षापासून प्रलंबीत आहेत. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी लेखी निवेदन देऊन तक्रार केली आहे. लोकांनी मुख्यमंत्र्यांकडेही तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची दखल त्यांच्याकडून घेतली जात नसल्याने केवळ विचारणा करण्यासाठी गेलो होतो. आतापैसे खाता येत नसल्याने माझ्यावर खोटा आळ घेतला जात आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.