होमपेज › Sangli › सांगली : स्वाईन फ्लूने तरुणाचा मृत्यू

सांगली : स्वाईन फ्लूने तरुणाचा मृत्यू

Published On: Mar 28 2019 6:20PM | Last Updated: Mar 29 2019 1:39AM
कडेगाव : शहर प्रतिनिधी 

तालुक्यातील वडियेरायबाग येथील पंडित नंदकुमार शेळके (वय. ३४) यांचा बुधवारी ( दि. २७ )रोजी  'स्वाईन फ्लू'ने मृत्यू झाला. दरम्यान ऐन उन्हाळ्यात 'स्वाईन फ्लू' ने बळी गेल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

वडियेरायबाग येथील पंडित शेळके हे कणकवली येथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते .दरम्यान काही कामानिमित्त  ते आपल्या गावी आले होते. या दरम्यान त्यांच्या वडिलांना कावीळ झाल्याने त्यांना पंडित यांनी मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंडित यांना सर्दी, ताप व कणकणीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यानी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु त्याना या उपचाराचा काही फरक पडला नाही, त्यानंतर त्यांनी मिरज येथे मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास सुरूवात केली. तेथे त्यांना प्रथमदर्शनी न्यूमोनिया झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर  डॉक्टरांनी त्यांची 'स्वाईन फ्लू' ची टेस्ट घेतली असता त्यांचा रिपोट पॉझिटीव्ह आला. त्यानंतर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेवून जात असताना बुधवारी रात्री  त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

पंडित शेळके यांचा 'स्वाईन फ्लू'ने मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेळके यांच्या कुटुंबियांना 'स्वाईन फ्लू' प्रतिबंधक 'टॅमी फ्लू' गोळ्या दिल्या आहेत.तसेच नेवरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाने गावात 'स्वाईन फ्लू' बाबत नागरिकांचे सर्व्हेक्षण सुरु केले आहे