Wed, Jul 08, 2020 17:10होमपेज › Sangli › कदम कुटुंबाच्या रक्तातच काँग्रेस : मोहनराव कदम  

कदम कुटुंबाच्या रक्तातच काँग्रेस : मोहनराव कदम  

Published On: Jun 14 2019 5:36PM | Last Updated: Jun 14 2019 5:36PM
कडेगाव : शहर प्रतिनिधी 

भाजपमध्ये प्रवेशाच्या कोणी कितीही वावड्या उठवल्‍या तरी आम्ही कदम कुटुंब काँग्रेसपक्ष कधीही सोडणार नाही. कदम कुटुंब काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. काँग्रेस पक्षातच नेहमी राहणार आहे. असा खुलासा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी डॉ पतंगराव कदम सोनहीरा साखर कारखाना येथे पत्रकारांशी बोलताना केला.

यावेळी बोलताना आमदार मोहनराव कदम म्हणाले, काँग्रेस पक्षाने आम्हाला खुप काही दिले. कदम कुटुंब हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. पक्षाने आजवर अनेक पदे दिली. त्या जोरावरच माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी पलूस - कडेगावसह जिल्ह्यात विकास कामांचा डोंगर उभा केला. टेंभू , ताकारी या बलाढ्य सिंचन कार्यान्वित करून या भागात हरितक्रांती घडवली. येथील दुष्काळी भागाचे नंदनवन केले. कडेगाव-पलूस मतदारसंघाचा भरघोस विकास केला. साहेब हे शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्ये राहिले. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडण्याचा कुटुंबातील कोणी विचारही करु शकत नाही. आमच्या रक्तातच काँग्रेस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे ते म्हणाले ,सोनहिरा कारखाना कार्यस्थळावर  माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे भव्य स्मारक उभारले जात असून, स्मारकाचे काम प्रगती पथावर आहे. येत्या ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर पहिल्या पंधरवड्याच्या दरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह केंद्र व राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या स्मारकाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे मोहनराव कदम यांनी सांगितले.

बॅलेट पेपरद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवावी : आमदार कदम 

देशात झालेल्या  लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजप विरोधी वातावरण होते. परंतु प्रत्यक्ष तसे घडले नाही. लोकांचा उद्रेक मतपेटीत  दिसला नाही. त्यामुळे मतदान यंत्राबाबत सर्वत्र शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे देशभरातून बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची मागणी होत आहे.अगदी प्रगत देशांतही बॅलेट पेपरद्वारे मतदान घेतले जात आहे. तेव्हा लोकांच्या मागणीचा विचार करुन निवडणुक आयोगाने यापुढे बॅलेट पेपरद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी भूमिकाही आमदार कदम यांनी यावेळी मांडली.